आमदार संजय सावकारेंचा पाठपुरावा ठरला यशस्वी : 31 कोटी 52 लाखांचा निधी मंजूर
भुसावळ (गणेश वाघ) – भुसावळ ग्रामीणसह तालुक्यातील साकेगाव व कंडारी येथील पाणीप्रश्न कायमचा निकाली निघणार असून राष्ट्रीय पेयल योजना टप्पा क्रमांक तीनमधून या गावांसाठी तब्बल 31 कोटी 52 लाखांचा निधी मंजूर झाला असून लवकरच कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार संजय सावकारे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना दिली. तालुक्यातील कंडारी येथील तब्बल 45 वर्षांपासून रेंगाळत असलेला पाणीप्रश्न या योजनेच्या माध्यमातून सुटणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाची लहर असून त्यासोबत भुसावळ ग्रामीणमध्ये समाविष्ट असलेल्या मात्र नगरपालिका कार्यक्षेत्रात न येणार्या विविध कॉलन्यांमधील रहिवाशांची पाण्यासाठीची वणवण आता थांबणार आहे तर साकेगावकरांना महागड्या औद्योगिक दराचे पाणी घेण्याची आवश्यकता भासणार नसल्याने समाधान व्यक्त होत आहे.
आमदार संजय सावकारेंचा पाठपुरावा ठरला यशस्वी
आमदार संजय सावकारे यांनी तालुक्यातील कंडारीसह साकेगाव व भुसावळ ग्रामीणमधील पाणीप्रश्न सुटण्यासंदर्भात राज्य शासनाकडे पाठपुराा केला होता. त्यानुषंगाने एमजीपीने प्रस्ताव तयार केले होते तर राष्ट्रीय पेयजल योजना टप्पा क्रमांक दोनमधून या गावांसाठी योजना मंजूर झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. या योजनेंतर्गत जलशुद्धीकरण यंत्रणा, पाण्याचा जलकुंभ व तसेच गावातील पाईप लाईन या पद्धत्तीने कामे केली जाणार आहेत.
पाणीप्रश्न सुटणार असल्याने समाधान -आमदार संजय सावकारे
तालुक्यातील कंडारी येथे गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या होती ती या माध्यमातून सुटणार असून भुसावळ ग्रामीणमध्ये राहणार्या नागरीकांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना होणार असल्याने त्यांचीदेखील पाण्यासाठीची वणवण आता थांबणार असून साकेगावकरांनाही दिलासा मिळणार असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.