भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथील युवतींना मारहाण करीत विनयभंग करण्यात आला तसेच जातीवाचक शिविगाळ करण्यात आल्याने या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने गावात मोठी खळबळ उडाली असून गावात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. एटीएममध्ये जाण्यासाठी युवतींनी मदत मागितल्यानंतर हा प्रकार घडल्याचे सूत्रांनी सांगितले. ही घटना सोमवारी सकाळी 11 ते रात्री 12 वाजेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल असून छायाबाई चंद्रकांत मराठे, चंद्रकांत मराठे, यशवंत मिस्त्री या संशयीत आरोपींना अटक करण्यात आली.
युवतींना आरोपींनी केली मारहाण
सोमवारी सकाळी 11 वाजता फिर्यादी व तिची मैत्रीण यांनी संशयीत अल्पवयीन आरोपीस एटीएम येथे जाण्यास मदत मागितली असता संशयीताने दिवसभर वारंवार फोन करून त्रास दिला तसेच सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास संशयीताने फिर्यादीस फोन करून मी तुम्हाला एटीएममध्ये घेवून जाण्यास मदत करतो, असे सांगत युवतीला लज्जा वाटेल, असे संभाषण केले तसेच रात्री 9.30 ते 12 वाजेच्या सुमारास साकेगाव येथील ग्रामपंचायतीसमोर बोलावून तेथे मोठ्या प्रमाणावर लोकांना जमा करून तेथे फिर्यादी मुलगी आणि तिच्या मैत्रीणीला जातीवरून अश्लील बोलत युवतींना मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर गावातील वातावरण तापल्यानंतर भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे व सहकार्यांनी साकेगाव गाठत गावात शांतता प्रस्थापीत केली. याप्रकरणी मंगळवारी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
या आरोपींविरोधात दाखल झाला गुन्हा
युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी छायाबाई चंद्रकांत मराठे, चंद्रकांत मराठे, यशवंत मिस्त्री, शुभम (पूर्ण नाव माहिती नाही) व अन्य एका अल्पवयीन आरोपीविरोधात अॅट्रॉसिटी, विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी भेट देत घडला प्रकार जाणून घेतला. गावात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून गावात शांतता असल्याचे निरीक्षक विलास शेंडे यांनी सांगितले.