राष्ट्रवादीची सत्ता मोडीत ; सरपंचपदी अनिल पाटील यांची वर्णी
भुसावळ- तालुक्यातील साकेगाव ग्रामपंचायतीत गेल्या वर्षांपासून असलेली राष्ट्रवादीची सत्ता मोडीत काढीत भाजपाला कमळ फुलवण्यात यश आले असून सरपंचपदी अनिल पुंडलिक पाटील यांची सरपंच पदावर वर्णी लागली आहे. अवघ्या एका मतांनी पाटील यांचा विजय झाला असून प्रतिस्पर्धी संगीता धनराज भोई यांना आठ मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. विजयानंतर भाजपा पदाधिकार्यांनी जल्लोष केला.
राष्ट्रवादीची सत्ता मोडीत
सुमारे 15 वर्षांपासून राष्ट्रवादीची ग्रामपंचायतीवर सत्ता होती आनंद ठाकरे, अनिल पुंडलिक पाटील, संगीता संतोष भोळे यांनी भाजपात प्रवेश करून राष्ट्रवादीला हादरा दिला. गुरूवारी सरपंच निवडीसाठी सभा असल्याने ग्रामपंचायत सदस्य सहलीवर रवाना झाले होते. सकाळी 10 ते 12 या वेळेत अर्ज भरण्यात आले. त्यात भाजपातर्फे अनिल पाटील तर राष्ट्रवादीतर्फे संगीता भोई यांनी अर्ज भरला. दुपारी एक ते दोन या वेळेत माघारीची मुदत देण्यात आली मात्र कुणीही माघार न घेतल्याने निवडणूक झाली. त्यात गुप्त मतदान घेण्यात आली. पाटील यांना नऊ तर भोई यांना आठ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून इंगळे यांनी काम पाहिले. त्यांना तलाठी महाजन, ग्रामसेवक दीपक मुंडके यांचे सहकार्य लाभले. भाजपाचे पाटील यांना आनंद ठाकरे, संगीता भोळे. सुरेश शंकर पाटील, अनिता अनिल सोनवाल, अरुणाबाई बळीराम सोनवणे, मीना गजानन सपकाळे, माणिक भादू पाटील, सुनीता डिगंबर पाटील व त्यांच्या स्वतःचे मत मिळून नऊ मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक युवराज लोणारी, प्रमोद सावकारे, राजेंद्र आवटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडीनंतर जल्लोष केला.