घातपाताने की नैसर्गिक मृत्यू ? शवविच्छेदन अवहवालानंतर होणार उलगडा ; अनोळखी महिलेची ओळख पटवण्याचे आवाहन
भुसावळ- तालुक्यातील साकेगाव शिवारातील जोगलखेडा मार्गावरील एका शेतात सुमारे 40 वर्षीय महिलेचा कुजलेल्या व निर्वस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. चार दिवसांपूर्वी या महिलेचा मृत्यू झाल्याचा अंदाज असून गेल्या आठवडाभरापासून ही महिला साकेगावात भीक मागून उदरनिर्वाह करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. घटनेच्या अनुषंगाने जागेवरच मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर दुपारी दफनविधी करण्यात आला. अनोळखी महिलेची ओळख अद्याप पटलेली नसल्याने ओळख पटत असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन तालुका पोलिसांनी केले आहे.
माहिती कळताच पोलिसांची धाव
साकेगाव शिवारातील जोगलखेडा मार्गावर प्रमोद जैन यांचे शेत युवा चौधरी यांनी कसण्यासाठी घेतले आहे. बुधवारी ते शेतात आल्यानंतर त्यांना मृतदेह आढळताच त्यांनी तालुका पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक गजानन करेवाड, विठ्ठल फुसे, विजय पोहेकर, अश्विनी खुरपुडे यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळी आल्यानंतर मृत महिलेचे कपडे अस्ताव्यस्त होते तर लिंबाच्या झाडाखाली कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीही पसरली. गेल्या चार दिवसांपासून ही महिला साकेगावसह परीसरात फिरून भेटेल त्याला भाकरी मागत असल्यास नागरीकांसह या परीसरातील शेतात काम करणार्या सालदारांनी सांगितले. सुरुवातीला महिलेच्या मृत्यूनंतर अनेक शंका-कुशंका वर्तवण्यात आल्या मात्र हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे कळताच अनेकांनी सुटकेचा श्वास घेतला.
शवविच्छेदनानंतर जागेवरच दफनविधी
गेल्या चार दिवसांपासून मृतदेह जागेवर पडून असल्याने उन्हामुळे शरीर फुगले होते तर मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीही सुटली होती. मृतदेह हलवणे शक्य नसल्याने पोलिसांनी जागेवर शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टरांच्या चमुला पाचारण केले. शवविच्छेदनानंतर जागेवर महिलेचा दहनविधी करण्यात आला. दरम्यान, मृतदेह आढळल्यानंतर मयताच्या अंगावर वस्त्र नसल्याने विविध चर्चाही रंगल्या मात्र पोलिसांनी महिलेच्या अंगावर एक साडी टाकून मृतदेह झाकला तर महिलेचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्यान अनेक चर्चांना पूर्णविरामही मिळाला.