साक्री पंचायत समितीतील सहा.लेखापालासह कनिष्ठ सहाय्यकाला पोलीस कोठडी

0

वैद्यकीय बिल काढण्यासाठी मागितली होती दोन हजारांची लाच

धुळे- जिल्हा परीषद शाळेतील उपशिक्षकाचे अपघात काळातील वैद्यकीय वेतन व रजा मंजुरीचे बिल काढण्यासाठी दोन हजारांच्या लाचेची मागणी करणार्‍या साक्री पंचायत समितीतील लेखापाल प्रदीप हरीभाऊ साबळे व लिपिक तथा कनिष्ठ सहाय्यक नंदकुमार रामदास खैरनार यांना धुळे एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास अटक केली होती. आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

पैशांसाठी शिक्षकाचे प्रकरण ठेवले प्रलंबित
तक्रारदार हे जिल्हा परीषद शाळेचे उपशिक्षक असून 2017 मध्ये त्यांचा अपघात झाला होता तर या काळातील वैद्यकीय रजेचे वेतन (पगार) बिल व रजा मंजुरीसाठी प्रकरण साक्री पंचायत समितीमध्ये प्रलंबित होते. आरोपी खैरनार व साबळे यांनी हे बिल काढून देण्यासाठी तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. मात्र तक्रारदाराने पैसे न दिल्याने आठ महिन्यांपासून प्रकरण प्रलंबित होते. तक्रारदाराने 31 रोजी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर आरोपींनी दोन हजारांची लाच मागितल्याचे सिद्ध झाले. आरोपींविरुद्ध सापळा लावण्यात आला असलातरी त्यांना त्याबाबत संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नव्हती. अखेर 11 रोजी दोघा आरोपींना अटक करण्यात आली व बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, गुरुवारी दुपारी पुन्हा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तपास धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शत्रूघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन देसले, निरीक्षक महेश भोरटेकर करीत आहेत.

लाचखोरांवर कारवाईसाठी संपर्काचे आवाहन
भ्रष्टाचारासंबंधी काही तक्रारी असल्यास वा कुणी शासकीय अधिकारी व कर्मचारी सरकारी कामाच्या मोबदल्यात लाच स्वरूपात पैसे वा वस्तू ची मागणी करत असल्यास तत्काळ धुळे लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपअधीक्षक शत्रुघ्न माळी (मो.9892771772) यांनी केले आहे.