साक्री । साक्री शहरासह पिंपळनेरात वीजचोरीचा हायटेक प्रकार उघडकीस आला असून 18 ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. महिला अभियंता पिनल दुसाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली असून या कारवाईमुळे वीज चोरांमध्ये घबराट पसरली आहे.
कडक धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय
साक्री शहरासह तालुक्यात वीजगळतीचे प्रमाण वाढत असल्याने महावितरणचे अधीक्षक अभियंता डी.व्ही.पडळकर, कार्यकारी अभियंता संजय सरग, उपकार्यकारी अभियंता किशोर पाटील यांनी कडक धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेवून महिला अभियंता पिनल दुसाणे यांना ही वीजगळती रोखण्यासह वीजचोरी उघडकीस आणण्याची जबाबदारी सोपविली. महिला अभियंता दुसाणे यांनी साक्री ग्रामीणचे अभियंता सोनल नागरे, पिंपळनेरचे अभियंता व्हि.ए.देवरे, दीपक सोनवणे, शरद धनगर यांच्या पथकाने साक्री शहरात बसस्टॅण्ड, पेरेजपूर, आदर्शनगर आदी उच्चभ्रु वसतीसह पिंपळनेरात शोधमोहिम राबविली.
भविष्यातही सुरू राहणार मोहीम
या मोहिमेत ज्या ग्राहकांचा वीजवापर मोठ्या प्रमाणात असूनही त्यांना वीजबिल अत्यल्प येत असल्याने त्यांच्या मीटरची तपासणी करण्यात आली. या तपासणीत मोठ्या प्रमाणात वीजचोरी उघडकीस आली. मीटरमध्ये फेरफार करुन तसेच मीटरमध्ये रजीस्टन्स टाकून रिमोटच्या सहाय्याने वीजचोरी होत असल्याचे आढळून आले. साक्री शहरात 12 ग्राहकांवर तर पिंपळनेर शहरात 6 ग्राहकांवर वीजकायदा अधिनियमातील कलम 135 व कलम 126 अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे वीजचोरांमध्ये धडकी भरली असून ही मोहिम पुढेही चालू रहाणार असल्याचे महिला अभियंता पिनल दुसाणे यांनी म्हटले आहे.