पिंपळनेर । येथील उपबाजार समितीत कांद्याची आवक वाढली असून, 400 ते 500 भावाने खरेदी झाल्याची माहिती बाजार समितीने दिली आहे. साक्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पिंपळनेर येथील उपबाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीस येत असून, व्यापारीवर्गही खरेदीसाठी बोली लावत आहेत. दोन दिवसांपूर्वी बाजार समितीत 500 ते 800 वाहनांमधून कांदा खरेदी झाली. प्रतवारीनुसार 55 रुपये क्विंटल ते चांगल्या कांद्याला 400 ते 500 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला. पिंपळनेरसह परिसरात कांद्याची लागवड झालेली आहे. नवापूर, साक्री, नंदुरबार, पिंपळनेर उपबाजार समितीत कांद्याची आवक वाढली निजामपूर, दुसाणे, कासारेसह पश्चिम पट्ट्यातील वार्सा, कुडाशी भागातून पिंपळनेर उपबाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक सुरू आहे. त्यातील काही माल हा परस्पर व्यापारी खरेदी करीत आहेत.
महिना उलटूनही पैसे नाही
साक्री तालुक्यातून कांद्याची निर्यात सुरू झाल्याने शेतकरी व व्यापारी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, महिना उलटूनही कांद्याचे रोख पैसे मिळत नसल्याने शेतकर्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. त्यामुळे काही व्यापार्यांनी धनादेश दिले, पण खात्यावर पैसे शिल्लक नसल्याने धनादेश वटत नसल्याने सतांप व्यक्त करण्यात येत आहे. शेतकर्यांनी आपला कांदा 15 ते 20 दिवसांपासून शेतात काढून ठेवला आहे. अनेक शेतकर्यांचा कांदा साठवणुकीसाठी चाळी तयार असल्याने चांगला कांदा हमीभाव मिळेल, या अपेक्षेने कांदा उत्पादकांनी चाळीत साठवणूक केली आहे. मात्र ज्यांच्याकडे चाळी नाहीत तसेच लग्न समारंभ व मजुरीसाठी पैसे नाहीत अशा शेतकर्यांनी आपला कांदा टॅक्टर, पिकअप व मिळेल त्या वाहनाने मार्केटला आणत आहे. यामुळे कांद्याची आवक वाढली आहे.
धनादेश वटेनात…
अंबापूर येथील अर्जून तुळशीराम मारन यांनी 7 एप्रिल रोजी कांदा विकला होता. 24 एप्रिलपर्यंत पैसे मिळतील म्हणून त्यांना 18 हजार 400 रुपयांचा बँकेचा धनादेश मिळाला. पण, अद्यापपर्यंत तो वटला नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पिंपळनेर येथील रवींद्र चंद्रसिंग राजपूत यांनीही 4 एप्रिल रोजी कांदा विकला. त्यांनाही एका व्यापार्याने 10 हजार रुपयांचा धनादेश दिला, तोही आजपर्यंत वटला नसल्याचे सांगितले. प्रतापपूर येथील शेतकरी बाजीराव दगा ठाकरे यांनाही धनादेश देण्यात आला होता. धनादेश दिलेल्या खात्यावर पैसे नसल्याने शेतकर्यांची फसवणूक झाल्याचे कळते. धनादेश देवूनही शेतकरी बांधवांना पैसे मिळत नसल्याने व कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकर्यांमध्ये नाराजी आहे.