साक्री (चंद्रकांत वाणी) । साक्री शहराला तालुक्याचा दर्जा असल्याने व क्षेत्रफळाच्या दृष्टीने विकसित असलेल्या तालुक्यातील नागरिकांचे आर्थिक व्यवहारासाठी शहरात नेहमीचे येणे-जाणे असते. येथील राष्ट्रीयकृत बँकामध्ये सतत वर्दळ असते. त्याचे कारण म्हणजे शहरात अनेक एटीएम मशीन बसवले आहेत. मात्र सद्यस्थितीत एटीएम फक्त शोपीस म्हणुन उभे असल्याने नागरिकांना उन्हातान्हात पायपीट करावी लागत आहे. एटीएम मशीन बंद असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
लग्नसराईच्या दिवसांत त्रास
नोटाबंदीनंतर अजुनही बँकामध्ये वर्दळ सुरूच असल्याने नागरिक एटीएमकडे धावतात. शहरात सात एटीएम मशीन असून सर्व बंद स्थितीत असल्यामुळे नागरिक हैराण होत आहेत. बँक व्यवस्थापन प्रतिवर्षी एटीएम कार्ड धारकाला कर आकारून त्याच्या खात्यामधुन रक्कम वर्ग करून घेतली जाते. मात्र त्याबाबातची सुविधा देण्याची बांधिलकी बँका जपत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. लग्नसराईचे दिवस असल्यामुळे लोकांना पैशांची अधिक गरज भासते. अशा वेळेस बँकेत तास न तास उभे राहुनदेखील बँक कर्मचारी शिल्लक नसल्याचे सांगतात त्यामुळे काही वेळा रिकाम्या हाती परत यावे लागते.
साक्री शहरातील बहुतेक बँकामधील एटीएम मशिन्सची वाताहात झाली आहे. शहरामध्ये बहूतेक बँकामधील एटीएम मशीन बंदच राहतात. त्यामुळे आमच्यासारख्या ग्राहकांची वेळ आणि श्रम विनाकारण वाया जाते. एखादे मशिन सुरू असले तर तासभर उभे राहुनदेखील त्यातली कॅश संपली तर खाली हात परत जावे लागते. याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यापेक्षा हे मशिन बंदच करून टाका.-बी.एल.भावसार, निवृत शिक्षक
शहरात पाच ते सात ठिकाणी एटीएम मशिन आहेत. परंतू त्याठिकाणी नेहमी कॅश शिल्लक नाही असे बोर्ड लावलेले राहतात. तालुक्याच्या दृष्टीने ही अंत्यत खेदजनक बाब आहे. याकडे बँक व्यवस्थापनाने लक्ष देणे गरजेचे आहे. – सईद युसूफ पटेल, नागरिक
शहरातील सातही एटीएम बंद
साक्री शहरात राष्ट्रीयकृत बँकाचे सात एटीएम मशिन्स आहेत. बर्याचवेळा काही बंद असतात तर काही उघड्या असुन त्यात कॅशच शिल्लक नसल्याने नागरिकांना हताश होण्याची वेळ येते. शहरात एखादे मशीन चालु असल्यास नागरिकांना तास न तास त्याठिकाणी रांगेत उभे राहुन पैसे काढण्यासाठी ताटकळत रहावे लागते. ग्राहकांची होणारी हेळसांड व्यवस्थापनाने लक्षात घेवून बँकानी एटीएम मशिन्स 24 तास सुरु ठेवून पुरेशी सुविधा प्रदान करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.