साखर कारखान्यांची वीज घेण्यास शासन उदासीन

0

बारामती । कोळशापासून तयार होणार्‍या विजेमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. असे असूनही सहकारी साखर कारखान्यांची वीज घेण्याची तयारी राज्यसरकारची नाही. साखर कारखान्यांची वीज घेतल्यामुळे ऊस उत्पादक सभासदांना दोन पैसे ज्यादा मिळतील. उत्पादक कंपन्यांनी चांगली प्रगती केली असून त्याद्वारे शेतकर्‍यांच्या मालाला पैसे मिळत आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी व्यक्त केले.

कारखान्याची विस्तारवाढ
भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारवाढ व 18 मेगावॅट क्षमतेच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते पाटील, कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, साखरसंघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, विश्‍वनाथबुवा गावडेे, कार्यकारी संचालक गोविंद अनारसे, कारखान्याचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, सभासद याप्रसंगी उपस्थित होते.

काटकसरीचे धोरण स्विकारा
कारखान्यांनी काटकसरीचे धोरण स्विकारले पाहिजे. खासगी साखर कारखाने आले आहेत. सहकारी साखर कारखान्यांना भाग भांडवल द्यायचे नाही. यातूनच पर्यायाने खासगी साखर कारखानदारी वाढत गेली. एकट्या इंदापूर तालुक्यात 40 लाख मे. टन ऊस उपलब्ध असून त्याचे गाळप करणे गरजेचे आहे. पुढच्या वर्षी यंदाच्या चांगल्या पावसामुळे प्रचंड प्रमाणात ऊस उपलब्ध असणार आहे. त्यामुळे कारखान्याची कसोटी लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीत साखरेचे दर पडत आहेत अशी चिंता अजित पवार यांनी व्यक्त केली. कारखान्याच्या सभासदांनी इतर कारखान्यांना ऊस देऊ नये. काही कारखान्यांनी शेतकर्‍यांच्या ऊसाचे पैसे बुडविलेले आहेत. त्यामुळे शेतकरी आणखीनच अडचणीत आला आहे. जीएसटीमुळे आर्थिक व्यवस्था मेटाकुटीला आली आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले.

कारखाना कर्जमुक्त करण्याचा विश्‍वास
सध्या संकटग्रस्त परिस्थिती असून प्रत्येक घटकापासून वीज निर्मिती केली पाहिजे. त्यासाठी सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे. इंडोनेशिया येथील शेतकर्‍यांनी ऊसाची नवीन जात विकसीत केली असून त्याला 40 दिवसांनी पाणी देण्याची गरज असते. त्यामुळे इथल्याही शेतकर्‍यांनी बदल करून शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेतले पाहिजे. येत्या पाच वर्षात कारखाना कर्जमुक्त हेाईल, अशी सभासदांना खात्री देतो, असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

9 लाख टन ऊसाचे होणार गाळप
कारखान्यावर 150 कोटींचे कर्ज असून दरवर्षी 15 कोटींचा हप्ता जाणार आहे. त्यामुळे काटकसरीचे धोरण स्विकारावे लागणार आहे. यंदाच्या गाळप हंगामात 9 लाख टन ऊसाचे गाळप होणार असून चांगल्या पध्दतीचा उताराही मिळेल. विस्तारवाढ न होता जवळपास आम्ही एक कारखानाच उपलब्ध केला आहे. त्यामुळे सभासदांच्या ऊसा व्यतिरिक्त गेटकेनही घ्यावा लागेल, असे कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप यांनी प्रास्ताविकात सांगितले. आभार कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी मांडले.