कर्नाटकमध्ये साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट; 6 जणांचा मृत्यू

0

बागलकोट: कर्नाटकातील बागलकोट येथील मुधोळ तालुक्यातील साखर कारखान्यात बॉयलरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी दि .16 रोजी दुपारी घडली असून यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे तर,10 हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत. यात मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्फोटाचे कारण अद्याप समोर आले नाही.

कर्नाटकातील बागलकोट तालुक्यातील मुधोळ येथे भाजपचे माजी मंत्री मुरूगेश निराणी यांच्या मालकीचा साखर कारखाना आहे. बागलकोट परिसर ऊस शेतीसाठी प्रसिद्ध आहे. सध्या ऊस गाळपाचा हंगाम सुरु असल्याने या कारखान्यात रविवारी एक हजारापेक्षा जास्त लोक काम करत होते. मात्र, दुपारच्या सुमारास अचानक कारखान्यातील बॉयलरमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की संपूर्ण मुधोळ गाव हादरले. यात 6 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

कारखान्यातील बॉयलरच्या स्फोटाची तीव्रता एवढी भयानक होती की तेथील भिंती ढासळल्या असून तेथील लोखंडी साहित्याची मोडतोड होऊन नुकसान झाले आहे. दरम्यान, क्रेनच्या मदतीने मलबा हटविण्याचे काम सुरू आहे. ढिगा-याखाली कोणी अडकले तर नाही ना हे पडताळून पाहिले जात आहे. यातील जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मुरूगेश निराणी घटनास्थळी दाखल झाले. मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले असून, घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.