पुणे । साखर उद्योगापुढील अडचणी सोडविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. साखर निर्यातीसाठी वाणिज्य मंत्रालय निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे प्रभू यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळासोबत प्रभू यांची बैठक झाली. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ आणि इंडियन शुगर मिल्स यांच्या संयुक्त विद्यमाने शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन प्रभू यांना देण्यात आले.
निर्यात शुल्क रद्द करण्यात यावे
याप्रसंगी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे उपाध्यक्ष अमित कोरे, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे आदी उपस्थित होते. साखरेचे दर घसरल्याने ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारी अडचणीत आलेली आहे, असे बैठकीत हर्षवर्धन पाटील यांनी नमूद करीत केंद्र सरकारने साखर निर्यातीस प्रोत्साहन देऊन दिलासा देणारे निर्णय घ्यावे, अशी मागणी केली.
निर्यात साखरेवरील 20 टक्के शुल्क रद्द करण्यात यावे, साखरेची पूर्णपणे आयात बंदी करण्यात यावी, इंडोनेशियासह अन्य देशांकडून पामतेल आयात करून त्या बदल्यात साखर निर्यात करण्याचे धोरण आखावे, केंद्र सरकारने सलग 10 वर्षांसाठी आयात-निर्यात धोरण जाहीर करावे, आदी मागण्या बैठकीत करण्यात आल्या. या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन प्रभू यांनी दिल्याचे पाटील यांनी सांगितले.