साखर संकुल आवारात एसटी पार्किंगसाठी जागा

0

पुणे : शिवाजीनगर ते स्वारगेट या 5 किमी च्या भुयारी मेट्रो मार्गात शिवाजीनगर येथील नियोजित मेट्रो स्टेशन तसेच ट्रान्सपोर्ट हब कामासाठी हे बसस्थानक आता वाकडेवाडी डेअरी  फार्मच्या सुमारे 2 एकर जागेत स्थलांतरित केले जाणार आहे. मात्र, येथील जागा एसटी बसेस पार्किंगसाठी कमी पडणार असल्याने साखर संकूल आवारात 15 बसेस पार्किंगची सुविधा  उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही जागा महामेट्रोकडून भाडेतत्वाने घेतली जाणार आहे. तसेच या ठिकाणी केवळ रात्रीच्या वेळेतच पार्किंग केले जाणार असल्याचे महामेट्रोच्या
अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

शिवाजीनगर येथे मेट्रोचे भुयारी स्थानक असून याच ठिकाणी मेट्रो, एसटी, पीएमपी तसेच रेल्वेला जोडणारे मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हब उभारले जाणार आहे. मात्र,  त्यासाठी शिवाजीनगर एसटीचे स्थानक स्थलांतरित महामेट्रोने वाकडेवाडी येथील डेअरी फार्मच्या काही जागेची मागणी शासनाकडे केली होती. ती जागा महामेट्रोकडे हस्तांतरित झाली आहे.

एसटी स्थानकाचे स्थलांतर केले जाणार असल्याने महामेट्रोने जानेवारीतच या ठिकाणी काम सुरू केले होते. त्यासाठी एसटी प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावानुसार, तसेच त्यांच्या  मागणीनुसारच काम करण्यात येत आहे. मात्र, हे काम सुरू असतानाच एसटी प्रशासनाने वारंवार त्यात बदल सूचविले. त्यामुळे हे काम रखडल्याचे महामेट्रोच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. या ठिकाणचे काम मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, विलंब होत असल्याने आणखी महिनाभर स्थलांतराला उशीर होणार असल्याचे महामेट्रोच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.