कल्याण । केंद्र व राज्य सरकारच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत ठिकठिकाणी जलवाहतुकीचे प्रकल्प सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महाराष्ट्राला कोकण किनारी 725 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. जलवाहतुकीमुळे महागाई कमी होईल, असा दावा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. डोंबिवली पत्रकार संघ आयोजित वार्तालाप कार्यक्रमात संवाद साधताना चव्हाण यांनी हे मत व्यक्त केले. राज्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले की, रस्ते माल वाहतुकीचा खर्च जास्त आहे.
जलवाहतुकीप्रमाणेच कोकण किनारपट्टीलगत कोस्टल रोड तयार करण्याचा मानस केंद्र सरकारचा आहे. त्यादृष्टीने सरकारचे प्रयत्न आहे. जलवाहतुकीला सरकारने प्राधान्य दिले आहे. विविध बंदराचा विकास सुरू केला आहे. त्यामुळे बंदरात दोन लाख मेट्रिक टन क्षमतेची जहाजे येऊ लागली आहे. यापूर्वी इतक्या मोठ्या क्षमतेची जहाजे बंदरात मार्गक्रमण करीत नव्हती. समुद्राच्या आत बंधारे बांधून चॅनल तयार केले जाणार आहे तसेच अनेक बंदरातील गाळ काढल्याने जहाजे थेट बंदराच्या किनारी येऊ लागली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
जलवाहतुकीत कमी खर्च
त्यात इंधन व वेळ वाया जातो तसेच रस्ते माल वाहतुकीमुळे वाहतूक कोंडीचा सामना प्रवासी वाहतुकीला करावा लागतो. रस्ते जलवाहतुकीपेक्षा रेल्वे मालवाहतूकीचा खर्च कमी आहे, तर रेल्वे मालवाहतुकीपेक्षाही जलवाहतूकीचा खर्च कमी आहे. जलवाहतुकीचे प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर मालवाहतुकीसाठी लागणारा खर्च हा रस्ते वाहतुकीच्या तुलनेत अत्यंत कमी असेल. जलवाहतुकीमुळे महागाई कमी होण्यास जास्त मदत होईल, असे चव्हाण यांनी नमूद केले.