धुळे । साडी म्हटली की, महिलांना स्वर्ग गाठल्यासारखे होते. आपल्या पती राजाच्या मागे लागून वर्षातून आठ ते दहा महागड्या साड्या गटवायच्याच, असा ठरलेला उपक्रम महिला वर्गाचा आहे. त्यात पैठणी मिळणार म्हटल्यावर तर महिलांच्या आनंदाला सीमाच नसते. ही झाली महिलांची पसंती. मात्र आता तर चोरट्यांनाही पैठणीचा हव्यास जडला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण, गेल्या पंधरा दिवसाच्या अंतराने वाडीभोकर रोडवरील तब्बल दोन साडींचे दुकान चोरट्यांनी लक्ष्य केले. या दोन्ही दुकानातून सुमोर तीन लाखांच्या महागड्या पैठणी साड्याच लंपास करण्यात आल्या आहेत. यामुळे चोरट्यांनाही पैठणीने भुरळ घतल्याचे बोलले जात आहे.
साडी व्यावसायिकांची उडाली झोप
परंतू, आता मात्र पैठणी साडी चोरांच्या टोळीने साडी व्यावसायिकांची आणि पोलिसांची झोप उडविली आहे. पंधरा दिवसांच्या अंतराने तब्बल दोन पैठणी साडी विक्रीचे दुकान फोडून चोरट्यांनी धुमाकूळच घातला आहे. वाडीभोकर रोडवरील सिंधू त्र्यंबक कॉम्पलेक्समध्ये योगीता मगन पाटील यांच्या मालकीचे समीक्षा नावाचे साडी विक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी शटरचे बाजूने साईड पट्टी कापून दुकान उघडले. आत प्रवेश करुन तब्बल एक लाख 75 हजार रुपयांच्या पैठणी साड्या लंपास केल्यात. आज सकाळी हा प्रकार लक्षात आल्याने पाटील यांनी पोलिसांना ही माहिती दिली. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होईल.
चंदन चोरांचा हैदोस कमी
चोरांचे मन कशावर जडेल, हे आता सांगणे कठीण बनले आहे. आधी धुळे शहरात चंदन चोरांच्या टोळीला पोलीस यंत्रणा पुरती वैतागली होती. ही टोळी ठराविक कालावधीत जिल्हाधिकारी यांच्या बंगल्यात तसेच सीईओ यांच्या निवासस्थानात आणि अन्य ठिकाणच्या चंदनाच्या झाडांची कटाई करुन त्यातील अतिमहत्वाची ’गर’ लंपास करीत होते. त्यावेळेस थेट जिल्हाधिकारी बंगल्यातच चोरी म्हटल्यावर पोलिसांची अगदीच पंचाईत व्हायची. गेल्या काही वर्षापासून ही चंदनाच्या झाडांची चोरी थांबल्याने पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
पहिल्या चोरीचा तपास अद्याप नाही
याच वाडीभोकर रोडवर साईकपा साडी व पैठणी विक्रीचे दुकान आहे. दहा दिवसांपूर्वीच चोरट्यांनी या दुकानाचे शटर उचकवून त्यातूनही दीड लाखांच्या पैठणी साड्या चोरुन नेल्या होत्या. पंधरा दिवसाआधी झालेल्या चोरीचा तपास लागला नसतांना समीक्षा साडी दुकानात पावने दोन लाखांच्या पैठणी साड्या लंपास झाल्या. पोलिसांचा संथगतीने होणारा तपास हा चोरट्यांसाठी संधी ठरत आहेत.