वेल्हाळा ग्रामपंचायतीच्या पावित्र्याने खळबळ ; तोडग्याच्या आश्वासनाने निघाले कुलूप
भुसावळ- तालुक्यातील वेल्हाळा येथील वीज वितरण कंपनीच्या 33 केव्ही सबस्टेशन केंद्राला वेल्हाळा ग्रामपंचायतीने तब्बल 12 लाख 40 हजारांच्या कर थकबाकीपोटी शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास कुलूप ठोकल्याने वीज कंपनीच्या वर्तुळात खळबळ उडाली. 1997 पासून ग्रामपंचायतीच्या जागेवर असलेल्या सबस्टेशनकडे तब्बल 12 लाख 40 हजारांची थकबाकी असल्यानंतरही ती मिळत नसल्याने ग्रामपंचायतीतर्फे वारंवार नोटीसा बजावण्यात आल्या मात्र संबंधित अधिकार्यांनी दखल घेतली नसल्याचे सरपंच विजय पाटील म्हणाले. अखेरचा तोडगा म्हणून शुक्रवारी नऊ ग्रामपंचायत सदस्यांना सोबत घेत सरपंचांनी दुपारी 12 वाजता 33 केव्ही स्टबस्टेशनला कुलूप ठोकल्याने खळबळ उडाली. कार्यकारी अभियंता पी.आर.घोरूडे यांनी तातडीने डेप्यु.इंजि.पाटील यांना घटनास्थळी पाठवून चर्चा केली. या प्रश्नावर तोडगा काढण्याचे सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कुलूप काढण्यात आल्याचे सरपंच म्हणाले.
ग्रामपंचायतीची भूमिका चुकीची -घोरूडे
वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता पी.आर.घोरूडे या संदर्भात म्हणाले की, मुळात कर भरणा हा विषय सिव्हील डिपार्टमेंटकडून होत असतो. गव्ह.गॅझेटनुसार दोन लाख 14 हजारांपर्यंत कर रक्कम निघते व त्याबाबतचा धनादेश आम्ही पाठवल्यानंतर ग्रामपंचायतीने तो परत पाठवल्यानंतर पुन्हा 16 जानेवारीला आम्ही पत्र देवून धनादेश आरपीडी करून पाठवला. ग्रामपंचायतीला कराबाबत काही घरकत घ्यायची असेल तर त्यांनी सिव्हील विभागाकडे दाद मागायला हवी होती, असेही ते म्हणाले.