साडेसहाशे अंध मुलांच्या जीवनात ‘प्रकाश’

0

हडपसर । रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरीटी (आरओपी) मुळे देशात दरवर्षी तीन हजार बालके अंध होत आहेत. कमी वजनाच्या (2000 ग्रॅमपेक्षा कमी) व 34 आठवड्यांपूर्वी जन्मलेल्या बालकांमध्ये आढळून येणारा हा नेत्रविकार आहे. यावर मात करण्यासाठी एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयात राज्यातील एकमेव आरओपी प्रतिबंधक सेंटर उभारले आहे. या माध्यमातून 650 मुलांना लेझर उपचारांच्या सहाय्याने अंधत्व येण्यापासून वाचविले असून त्यांच्या जीवनात ‘प्रकाश’ फुलला आहे.

जागतिक प्रीमॅच्युरीटी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रकल्प संचालिका डॉ. सुचेता कुलकर्णी म्हणाल्या, प्रीमॅच्युर बेबी म्हणजे प्रसूतीचे पूर्ण दिवस भरण्यापूर्वी जन्मलेले बाळ. प्रसूतीमधील गुंतागुंतीमध्ये काही वेळा बाळाचा जन्म लवकर होतो. त्यामुळे त्याच्या डोळ्यांच्या अंतरपटलावरील रक्तवाहिन्याची वाढ अपूर्ण होते. अशा परिस्थितीत बाळ आजारी पडल्यास त्याला आरओपी हा आजार होण्याची शक्यता असते. मात्र, उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा, वेळेत होणारी नेत्र तपासणी व उपचाराने हे अंधत्व टाळता येऊ शकते. ही तपासणी विशिष्ट यंत्राच्या सहाय्याने प्रशिक्षित नेत्रतज्ज्ञांकडून मूल एक महिन्याचे होण्याआधी करून घेणे आवश्यक आहे. मात्र, याबाबत अनेक नेत्र व बालरोग तज्ज्ञांमध्ये जनजागृती झालेली नाही. यासाठी एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाने आरओपी प्रतिबंधक प्रकल्प सुरू केला आहे.

आरओपी म्हणजे काय?
प्रसूतीचे पूर्ण दिवस भरण्यापूर्वी जन्मलेल्या अर्भकाच्या नेत्रपटलाची वाढ पूर्णतः न होणे. नेत्रपटलाला रक्त पुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांची अस्वाभाविक वाढ होणे. कायमचे अंधत्व येणे, दृष्टी कमी होणे. कायमचे अंधत्व आल्यास त्यावर उपचार नाहीत.

कोणाला होऊ शकतो आरओपी?
प्रसूतीचे पूर्ण दिवस भरण्यापूर्वी जन्म व 2000 ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे अर्भक. अर्भकाला आजारात अतिदक्षता विभागात अधिककाळ ठेवणे व कृत्रिम ऑक्सिजन देणे. आरओपी टाळण्यासाठी उपाययोजना एका महिन्याच्या आत नेत्र तज्ज्ञांकडून अर्भकाची तपासणी करणे. आरओपी दोष आढळल्यास लेझर, शस्त्रक्रिया व उपचार सुरू करणे.