साडेसहा कोटींचे अपहार प्रकरण : आरोपीला पुन्हा एक दिवसांची कोठडी

भुसावळ : महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या योजनेत साडे सहा कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी जळगाव आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेला आरोपी तथा साखळीतील मुख्य एजंट संदीप प्रभाकर सावळे (36, रा.भुसावळ) याची मंगळवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यास जळगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

बनावट खात्यात वळवले पैसे
संशयीत आरोपी संदीप सावळे याने गणेश कॉलनीतील स्टेट बँकेत बनावट चार खाते उघडून त्यात सुमारे 39 लाखांची रक्कम वळती करून काढल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे शिवाय आरोपीने अनेक कागदपत्रे बनावटरीत्या सादर करून बँकेची फसवणूकदेखील केली आहे. आरोपीने बनावट कागदपत्रे भुसावळातील एका छापखान्यात छापल्याची कबुली दिल्यानंतर मंगळवारी जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बळीराम हिरे व सहकारी भुसावळात दाखल झाले. संशयीताने सांगितलेल्या प्रिंटीग प्रेस चालकाला शहर पोलिसात चौकशीसाठी बोलावून त्याची सखोल चौकशी करण्यात आली.