नंदुरबार। आपल्या आगळ्या-वेगळ्या संस्कृती आणि परंपरांनी महाराष्ट्र व देशाच्या सीमा ओलांडून अवघ्या जगाच्या पर्यटन क्षेत्राला भुरळ घालणार्या, नंदुरबारच्या सातपुड्यातील आदिवासी होळीवर राज्याचे पर्यटन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रेरणेतून जिल्हा माहिती कार्यालायाने माहितीपट तयार केला आहे. शनिवार 13 मे रोजी या माहितीपटाचे प्रसारण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून दुपारी दीड वाजता करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली आहे.
संस्कृतीची ओळख
या होळीच्या आगळ्या-वेगळ्या गौरवास्पद संस्कृती आणि परंपरेची माहिती राज्यासह जगाच्या कानाकोपर्यातील मराठी माणसाला व्हावी या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने हा माहितीपट तयार करण्यात आला आहे. या माहितीपटात मोलगी, काठी, सोन, असली, धडगाव, वडछील पुनर्वसन वसाहत, धनाजे आदी ठकाणी होणार्या आदिवासींच्या होळी उत्सवाच्या चालणार्या धार्मिक विधी परंपरांचे, रंगभूषा, आभूषणे, दागिने, आदिवासी पारंपरिक वाद्ये, आदिवासी नृत्य आदींवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांनी या माहितीपटाच्या संकल्पनेवर संशोधन केले आहे. अर्चना देशमुख, दिनेश चौरे, बंडू चौरे यांनी संशोधन सहाय्य केले आहे. या माहितीपटाचे लेखन, दिग्दर्शन ब्रिज कम्युनिकेशनचे संचालक मिलिंद पाटील यांनी केले आहे.
सलग तिसरा माहितीपट
जिल्हा माहिती कार्यालायाने तयार केलेला व या महिन्यात प्रसारित होणारा हा तिसरा माहितीपट आहे. यापूर्वी नंदुरबार जिल्ह्याच्या पर्यटनावर आधारित ‘नंदनवन’, प्रकाशाच्या ऐतिहासिक व धार्मिक पर्यटनावर ‘प्रकाशपर्वणी’ हे माहितीपट यापूर्वीच दूरदर्शनवर प्रसारित झाले आहेत. हे सर्व माहितीपट जिल्ह्याच्या दृष्टीने दृकश्राव्य स्वरूपातील संदर्भमूल्य असलेला मौलिक ठेवा असून जिल्ह्यातील होळीवरील शासनामार्फत तयार करण्यात आलेला हा पहिलाच माहितीपट आहे. आज शनिवार, 13 मे 2017 रोजी या माहितीपटाचे प्रसारण होणार असून हा माहितीपट जिल्हावासीयांनी पर्यटन प्रेमींनी, आदिवासी संस्कृतीच्या अभ्यासकांनी अवश्य पाहावा, असे आवाहन जिल्हाधिकरी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.
पर्यटन मंत्र्यांचे प्रोत्साहन
‘आता बदल दिसतोय, माझा महाराष्ट्र घडतोय’ हे ब्रीदवाक्य ‘व्हीजिट महाराष्ट्र वर्ष’ आणि ‘आपले सरकार करू कामगिरी दमदार‘ या प्रेरणेतून राज्याचे पर्यटन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी राज्यासह नंदुरबार जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यात जिल्ह्यातील सातपुड्याच्या अंगाखांद्यावर विविध ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जाणार्या आदिवासींच्या होळीचाही समावेश आहे. राज्याच्या पर्यटन विकास महामंडळानेही या होळीला हजेरी लावून त्याचे ब्रँडिंग केले होते.