सातपुड्यात बिबट्याच्या तरुणावर हल्ला ; प्रतिहल्ल्यात बिबट्याचा मृत्यू

0

यावल- सातपुड्याच्या वनक्षेत्रात एका 23 वर्षीय तरूणावर हल्ला करणार्‍या बिबट्या तब्बल 20 मिनिटांच्या झुंजीनंतर ठार झाला. ही घटना रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. सातपुड्याच्या वनक्षेत्राला लागून शेतात नांगरणी करण्याकरीता हा तरूण गेला होता. समीर युसूफ तडवी (रा.तिड्या, ता. रावेर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. रविवारी सकाळी 10 वाजता यावल प्रादेशिक वनविभागाच्या पुर्व क्षेत्रांतर्गत येणार्‍या कम्पार्टमेंट क्रमांक 44 जवळील शेताच्या बांधाजवळ तो पाणी पिण्याकरीता गेला असता अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. तेव्हा या तरूणाने स्वतःला वाचवण्याकरीता हातात मिळालेल्या दगडाव्दारे बबट्यावर प्रति हल्ला केला. 20 मिनिट चाललेल्या या झुंजीमध्ये बिबट्या ठार झाला. जखमी अवस्थेत तरूण न्हावी, ता.यावल येथे पोहोचला व घडलेल्या घटनेची माहिती वनविभागास दिली. तरूणावर न्हावी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा समान्य रूग्णालयात हलवण्यात आले आहे.