“सातारा मॅरेथॉनमध्ये भुसावळच्या धावपटूंची यशस्वी कामगिरी”

जगप्रसिद्ध सातारा हिल हाफ मॅरेथॉन नुकतीच साताऱ्यातील येवतेश्वर डोंगरमाथ्यावर संपन्न झाली. त्यात भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या उमेश घुले, तरुण बिरिया, संजय भदाने, कौस्तुभ मंत्री, प्रियंका मंत्री, प्रदीप सोलंकी, अजय आंबेकर, गणसिंग पाटील, प्रवीण पाटील या धावपटूंनी 21 किमी धावून यशस्वी सहभाग नोंदविला.

समुद्रसपाटीपासून ११०० मीटर उंचीवर डोंगराच्या रस्त्याने धावत जाऊन ही स्पर्धा पूर्ण करणे प्रत्येक धावपटूसाठी आव्हान आहे. यावर्षी ७५०० हून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. त्यापैकी केवळ ५९८५ धावपटू सदरची अवघड स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करू शकले.

पोलीस परेड ग्राउंडपासून ठीक सकाळी ६.३० वाजता या स्पर्धेस सुरुवात झाली. खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, पोलीस महासंचालक आदी अधिकाऱ्यांसमवेत स्पर्धेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे यावेळी उपस्थित होते.

पहाटेपासूनच जाणवणारी हवामानातील आद्रता, सतत उंच उंच होत जाणारा डोंगर व रस्त्याच्या दुतर्फा धावणाऱ्या स्पर्धकांची जत्रा प्रत्येक धावपटूची परीक्षा घेत होते. परंतु याही विपरीत परिस्थितीत साताऱ्यातील अबालवृद्ध नागरिकांने प्रत्येक धावपटूचे टाळ्या वाजवून केलेले स्वागत धावपटूंचा उत्साह वाढवीत होते. ठीकठिकाणी शालेय विद्यार्थी बँड, ढोल, लेझीम वाजवून स्पर्धकांचे स्वागत करीत होते. शिवाय ठीकठिकाणी पेयजलाची व्यवस्था, बिस्कीट, चॉकलेट, गूळ आदी उत्साहवर्धक खाद्यपदार्थांची केलेली काटेकोर व्यवस्था वाखाणण्याजोगी होती. चोख पोलीस बंदोबस्तामुळे रहदारीचे नियमन योग्य होऊन धावपटूंसाठी रस्ता अगदी मोकळा करण्यात आला होता.

त्यामुळे मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर पदक गळ्यात पडल्याबरोबर ‘काय तो येवतेश्वर डोंगर, काय ती हिरवळ, काय ती व्यवस्था व काय ती मॅरेथॉन’ अशी भावना धावपटू गमतीने बोलून दाखवत होते.

या यशाबद्दल भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे प्रमुख प्रा. प्रवीण फालक, सर्व धावपटू, सायकलपटू व जलतरणपटू यांसह शहरातील असंख्य नागरिकांनी धावपटूंचे अभिनंदन केले.