सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गाची पुनरर्चना फसली

0

चुकीच्या कामामुळे लाखोंचा फटका : नियोजन नसल्याने ‘बीआरटी’ झाला दुचाकी मार्ग

पुणे : वाहतुकीची प्रयोगशाळा म्हणून ओळखल्या जाणार्‍या सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गाची पुनरर्चना फसल्याचे समोर आले आहे. पद्मावती येथील बीआरटी बस थांब्याची रचना चक्क बीआरटी मार्गच कमी करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गातून बस तर सोडाच, पण दुचाकीही कशीबशी जात आहे. त्यामुळे या बस थांब्यासाठी केलेला खर्च पाण्यात गेला आहे.

सातारा रस्त्यावर बीआरटीचा स्वारगेट ते कात्रज हा पायलट प्रकल्प राबविण्यात आला होता. त्यासाठी रस्त्याचे रूंदीकरण करून जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत मध्यवर्ती भागात बीआरटी मार्ग, तर कडेला प्रशस्त पदपथ आणि सायकल ट्रॅक तयार करण्यात आले. मात्र, त्यामुळे रस्ता अरुंद झालाच शिवाय, पदपथ आणि सायकल ट्रॅकची जागा अतिक्रमणे, अनधिकृत स्टॉलने घेतली. तर बीआरटी मार्गही वारंवार होणार्‍या अपघातांमुळे बदनाम झाला. तसेच या रस्त्यावर वाहतूक कोंडीही वाढली. त्याचा फायदा उचलत पुन्हा या रस्त्यावर दोन मोठे उड्डाणपूल, तीन भुयारी मार्ग बांधण्यात आले. त्यामुळे संपूर्ण रस्ताच चढ उताराचा झाला.

बीआरटी मार्गातून दुचाकी जाणेही मुश्किल

दोन वर्षापूर्वी हा रस्ता महापालिकेने स्मार्ट स्ट्रिट अंतर्गत निवडून पुन्हा रस्त्याच्या पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी कोट्यवधीची निविदा काढण्यात आली. या कामावेळी या ठिकाणी असलेला बीआरटी मार्ग 32 टक्केच असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पुन्हा या कामात बीआरटी मार्गाची फेररचना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, महापालिकेने सल्लागार म्हणून नेमलेल्या कंपनन्यांनी बीआरटीच्या पहिल्या थांब्यामुळे जागा जात असल्याचा जावईशोध लावत, नगर रस्त्यावरील बीआरटीच्या धर्तीवर हे बसथांबे रस्त्याच्या मध्यभागी घेत दोन्ही बाजूला एकच थांबा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, हे बस थांबे रस्त्याच्या मध्यभागी आणताना, त्यामुळे कमी होत असलेल्या बीआरटी मार्गाकडे लक्षच देण्यात आले नाही. त्यामुळे पद्मावती येथील नव्याने उभारलेल्या बसथांब्यामुळे बस जाण्यासाठी अवघा 3 ते 4 फूटाचा रस्ता उरला असून त्यातून दुचाकी जाणेही मुश्किल झाले आहे.

वाहतूक कोंडी वाढणार

हा बस थांबा वापरायचा असल्यास महापालिकेस आता या ठिकाणी असलेला रस्ता दुभाजक मागे घ्यावा लागणार आहे. तसेच तो काढण्यासाठी व नव्याने बांधण्यासाठी पुन्हा 20 ते 25 लाखांचा खर्च करावा लागणार आहे. या शिवाय, सध्या मधोमध असलेला हा दुभाजक दुसर्‍या बाजूस सरकावल्याने वाहतुकीसाठीची जवळपास एक लेन कमी होणार आहे. त्यामुळे आधीच नवीन स्मार्ट स्ट्रीटमुळे पदपथ वाढल्याने रस्त्याची रूंदी कमी झाली असताना, आता पुन्हा दुभाजक मागे गेल्याने रस्ता अरूंद होऊन वाहतूक कोंडी होणार आहे.