साताऱ्यातील राष्ट्रवादीचे पहिले खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन

0

सातारा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन लक्ष्मणराव पाटील यांचे आज सकाळी ८१ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शरद पवारांचे जुने सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. साताऱ्यात सर्वप्रथम त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा रोवला होता.

लक्ष्मणराव पाटील हे पार्किन्सन आजाराने त्रस्त होते. आज दुपारी त्यांचे पार्थिव मुंबईतून साताऱ्यात आणण्यात येणार आहे. त्यानंतर विकासनगर येथील त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव ठेवण्यात येईल. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दर्शनासाठी ठेऊन बोपेगाव या त्यांच्या मुळगावी नेण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुमन पाटील, मुलगा मिलिंद, नितीन, आमदार मकरंद पाटील, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

लक्ष्मण पाटील हे १९६० साली ते बोपेगावचे सरपंच झाले. त्यानंतर वाई पंचायत समिती सभापती म्हणून त्यांनी १० वर्षे काम केले. १९८० साली लक्ष्मणराव जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. त्यांनी सलग 11 वर्षे जिल्हा परिषदेचा गाडा समर्थपणे हाकला. १९९९ साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी जिल्ह्यात सर्वात प्रथम त्यांनीच राष्ट्रवादीचा झेंडा रोवला. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले जिल्हाध्यक्ष झाले.