सात पॅसेंजर गाड्या लवकरच नियमित धावणार

0

मध्य रेल्वेचे जी.एम.डी.के.शर्मा यांची ग्वाही ; भुसावळातील विद्युत इंजिन कारखान्यासह झेडटीआरआयचे वार्षिक निरीक्षण ; कुर्ल्यातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मध्य रेल्वेत खुल्या खाद्यपदार्थ विक्रीवर बंदीचा निर्णय ; रेल्वेच्या वस्तू संग्रहालयासह उद्यानाचे लोकार्पण

भुसावळ- विद्युत निर्मिती करणार्‍या पॉवर प्लँटमध्ये कोळशाचा अल्प साठा असल्याने विद्युत निर्मितीवर परीणाम झाल्याने पॅसेंजर गाड्या चालवण्यात काहीशा अडचणी आल्या मात्र आता महाराष्ट्रात समाधानकारक कोळशाचा साठा उपलब्ध असून पुरेशी वीज निर्मिती होत असल्याने लवकरच बंद करण्यात आलेल्या पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक डी.के.शर्मा यांनी येथे दिली. शर्मा यांनी गुरुवारी भुसावळचा दौरा करीत सकाळी विद्युत इंजीन कारखाना (पीओएच) भेट देवून तपासणी केली त्यानंतर दुपारून झोनल ट्रेनिंग सेंटरची वार्षिक तपासणी केली. सायंकाळी त्यांच्या हस्ते रेल्वेच्या जुन्या संग्रहालयाचे उद्घाटन झाले तर रेल्वे स्थानकाबाहेर उभारलेल्या उद्यानाचेही त्यांनी लोकार्पण केले. सायंकाळी प्रसिद्धी माध्यमांशी त्यांनी संवाद साधत दिवसभरातील कामांबाबत माहिती दिली.

जी.एम.प्रथमच दिवसभर भुसावळात
गुरुवारी सकाळी सव्वा सात वाजता प्लॅटफार्म क्रमांक आठवर जी.एम.स्पेशल गाडीचे आगमन झाले. यावेळी डीआरएम आर.के.यादव यांनी शर्मा यांचे स्वागत केले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर रेल्वे अधिकार्‍यांची उपस्थिती होती. शर्मा यांनी सकाळी आरपीडी रोडवरील विद्युत इंजिन कारखान्याला भेट देवून पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी कारखान्यातील विविध विभागांची पाहणी केली तसेच अधिकारी-कर्मचार्‍यांशी संवादही साधला. दुपारून त्यांनी झेडआरटीआयचीदेखील वार्षिक तपासणी केली तसेच प्रसंगी अडचणीदेखील जाणून घेतल्या.

वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन, उद्यानाचे लोकार्पण
बसस्थानक मार्गावर रेल्वेकडून जुन्या वस्तूंचे संग्रहालय उभारण्यात आले असून त्यात कोळश्याचे इंजीन, जुना प्रवासी डबा, जुने डिझेल इंजीन ठेवण्यात आले असून रेल्वेच्या अन्य जुन्या वस्तूही तेथे ठेवण्यात आल्या आहेत. या संग्रहालयाचे गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता जी.एम.शर्मा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शर्मा यांनी संग्रहालयाची बारकाईने पाहणी केली. संग्रहालयात ठेवण्यात आलेली जुनी घड्याळ बंद असल्याने ती तातडीने सुरू करण्याची तसेच संग्रहालयात पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. संग्रहालयात भायखळ्याहून आणलेल्या प्रेसिंग काट्याची त्यांनी बारकाईने पाहणी केली तसेच स्थानिक कर्मचार्‍यांनी बनवलेल्या लोखंडी रेल्वेसह डबे तसेच जुन्या काळात रेल्वेत वापरल्या जाणार्‍या वस्तूंची देखील माहिती जाणून घेत काही सूचना अधिकार्‍यांना केल्या.

उद्घाटनालाच पडली रेल्वे बंद
वस्तू संग्रहालयाच्या आवारात जुन्या काळात वापरले जाणारे निरीक्षण यान ठेवण्यात आले आहे. रेल्वे अपघातानंतर हे निरीक्षण यान घटनास्थळी जात असे तर यानात अधिकार्‍यांसाठी जेवणाची व्यवस्था केली जायची त्याच पद्धत्तीने आताही त्यात पर्यटकांसाठी खाद्य पदार्थ खाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असून शर्मा यांनी या यानात बसून चहा-नास्ता करीत माहिती जाणून घेतली. संग्रहालयाच्या आवारात डिझेलवर चालणारी मिनी ट्रेनही ठेवण्यात आली असून शर्मा आल्यानंतर तिची ट्रायल घेण्यात आली मात्र उद्घाटनालाच ती बंद पडली मात्र नंतर ती पुन्हा सुरू करण्यात आली. वस्तू संग्रहालयाच्या निर्माणाबद्दल मॅकेनिकल विभागाला शर्मा यांनी 25 हजारांचा रोख पुरस्कार जाहीर केला.

रेल्वेच्या उद्यानाचेही लोकार्पण
शर्मा यांनी यानंतर रेल्वे स्थानकाच्या बाहेर बनवण्यात आलेल्या उद्यानाची पाहणी करून त्याचे लोकार्पण केले. प्रसंगी त्यांनी काही सूचनाही अधिकार्‍यांना केल्या. याप्रसंगी त्यांनी रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागात लावण्यात आलेल्या रणगाड्याची पाहणी करून त्याच्या दर्शनी भागावर रणगाड्याच्या माहितीबाबत फलक लावण्याच्या सूचना केल्या तसेच अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याबाबतही आदेश दिले. त्यानंतर शर्मा यांनी रेल्वे स्थानकाची पाहणी करून डीआरएम कार्यालयात कंट्रोल (परीचालन) विभागाच्या कक्षाचे उद्घाटन केले.

पॅसेंजर गाड्या लवकरच धावणार -शर्मा
डीआरएम कार्याल्यात झालेल्या पत्रकार परीषदेत शर्मा यांना भुसावळ विभागातून धावणार्‍या सात पॅसेंजर गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे होत असल्याबाबत छेडले असता शर्मा यांनी कोळशाच्या टंचाईमुळे वीज निर्मितीवर परीणाम झाल्याची बाब पुढे करीत काही गाड्यांना अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत लवकरच पॅसेंजर गाड्यांची समस्या सुटणार असल्याचे सांगितले. भुसावळातील विद्युत इंजिन कारखान्यातील इंजिन निर्मिती बंद बाबत ते म्हणाले की, सध्या रेल्वेला तशी डिझेल लोकोची आवश्यकता नाही शिवाय अन्य ठिकाणी त्यांचे उत्पादन सुरू असून भुसावळ येथे पुन्हा उत्पादन सुरू केल्यास मेन्टेनन्सची कामे होणार नाही, असे त्यांनी सांगितले. भुसावळातील नवीन कोच फॅक्टरीबाबत नवीन सरकार आल्यानंतर निर्णय होईल, असे त्यांनी सांगत या बजेटमध्ये फारशी तरतूद झाली नसल्याची कबुली दिली.

प्रवाशाच्या सजगतेचे आभार -शर्मा
कुर्ला येथे घाण पाण्यातील लिंबू सरबत बनवण्याचा व्हिडिओ एका सजग प्रवाशाने व्हायरल केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने या स्टॉलवर कारवाई केली होती. भुसावळ विभागातही अशाच पद्धत्तीने बेकायदा खाद्य पदार्थांची विक्री सुरू असल्याबाबत शर्मा यांना छेडले असता ते म्हणाले की, आम्ही सर्व विभागाला या व्हिडिओनंतर कारवाईचे आदेश दिले आहे. प्रवाशांच्या आरोग्याची आम्हालाही काळजी आहे त्यासाठी रेल्वे स्थानकावर आर.ओ.मशीन लावले जात आहेत. विभागातही अशा लोकांवर आता कारवाई होईल, फूड स्टॉल तपासणीचे आम्ही आदेश दिले आहेत.

राजधानीला थांबा शक्य नाही
भुसावळ विभागातून धावणार्‍या राजधानी एक्स्प्रेसला भुसावळला थांबा शक्यत नाही कारण तसे झाल्यास पुन्हा गाडीच्या वेळेवर परीणाम होईल, असे शर्मा म्हणाले. ताशी 130 वेगाने केवळ राजधानी धावते मात्र अन्य गाड्यांचा वेग आता आम्ही 110 केला आहे जो पूर्वी केवळ 90 ते 100 होतो, असेही ते म्हणाले. बडनेरासह चांदूरबाजार या स्थानकावरही त्यासाठी सुधारणा करण्यात आल्याचे ते म्हणाले.

यांची होती उपस्थिती
मध्य रेल्वेचे जी.एम.देवेंद्रकुमार शर्मा यांच्यासोबत डीआरएम आर.के.यादव, मुख्य परीचालन प्रबंधक डी.के.सिंग, मुख्य यांत्रिक अभियंता मनोज जोशी, मुख्य विद्युत अभियंता सुशील वावरे, मुख्य कार्मिक अधिकारी स्वामीनाथन, मुख्य सुरक्षा अधिकारी पी.भुरानी, मुख्य भंडार अधिकारी आदित्य शर्मा, मुख्य बँक अधिकारी अश्‍विन सक्सेना, एडीआरएम मनोज सिन्हा, वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा, वरीष्ठ परीचालन प्रबंधक डॉ.स्वप्नील नीला यांच्यासह रेल्वेच्या विविध विभागातील वरीष्ठ अधिकार्‍यांची उपस्थिती होती.