जळगाव । नेहमीच आजच्या युगात माणुसकी शुन्य झाली असून प्रामाणिक पणा राहिला नाही अशी ओरड असते. त्यात पैशाच्या बाबतीत तर चांगल्या चांगल्याची नियत पांगते. मात्र आजही माणुसकी शिल्लक असून प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे प्रत्यय आले आहे. मुळचे जामनेर तालुक्यातील गारखेडा बु.येथील रहिवासी असलेले व सध्या कांचन नगर येथे वास्तव्यास असलेले बंजार समाजातील युवकाने चुकुन बँक खात्यात जमा झालेले सात लाख रुपये बँकेला परत करुन प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. 6 जून रोजी त्याने सात लाखाची रक्कम किट्टी फायनान्स सर्व्हिसेसला परत केले.
प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतूक
कैलास मोतीलाल चव्हाण असे या युवकाचे नाव आहे. 3 जून रोजी कैलासच्या सारस्वत को.ऑप बँकेच्या खात्यात सात लाख रुपये आरटीजीएसद्वारे जमा झाले होते. मनोज मानकचंद चोरडीया यांच्या खात्यावरही रक्कम टाकावयाची होती, चुकुन सदरील रक्कम कैलास चव्हाण यांच्या खात्यात जमा झाली. या युवकाचे कडील 27 वर्षापूर्वी अपघातात मयत झाल्याने युवकावर परिवाराची जबाबदारी आली. उदरनिर्वाहासाठी ते जळगावात आले. या युवकाची कौटुंबिक परिस्थिती गरिबीची असून जळगावात केळी पानाचा व्यवसाय करुन ते उदरनिर्वाह करतात. कैलासच्या प्रामाणिकपणाचा सर्वत्र कौतुक होत आहे.