सात संशयितांची ‘नार्कोटेस्ट’ करण्यास न्यायालयाची परवानगी

0

जळगाव । तालुक्यातील भादली गावात 20 मार्च रोजी चौघांचा निर्घूण खून करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यात भोळे कुटूंबियातील पती, पत्नीसह दोन मुलांचा समोवश होता. दरम्यान, दीड महिना उलटूनही या हत्याकांडाचा तपास लागला नाही. त्यामुळे खर्‍या मारेकर्‍यांच्या तपासासाठी पोलिसांतर्फे गावातील काही जणांची ‘नार्कोटेस्ट’ करण्याची न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. त्यावर सोमवारी न्यायाधीश बी. डी. गोरे यांनी 7 जणांच्या नार्को टेस्ट करण्याची परवागी दिली असून त्यासाठी या सातही जणांना मंगळवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर त्यांची टेस्ट होणार आहे.

दीड महिना उलटूनही पोलिसांच्या हाती निराशा
भादली येथे प्रदीप सुरेश भोळे, पत्नी संगीता सुरेश भोळे, मुलगी दिव्या प्रदीप भोळे, तर मुलगा चेतन प्रदीप भोळे यांची 20 मार्च रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेला दीड महिना उलटला तरी पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. वेगवेगळ्या पद्धतीने तपास केला. मात्र त्यातही अपयश आले. या प्रकरणी संशयीत किंवा हत्याकांडात वापरलेले हत्यारेही पोलिसांच्या हाती लागली नाहीत. परराज्यात, आजुबाजुच्या जिल्ह्यांमध्ये पथके पाठविली. मात्र तरीही पोलिसांच्या हाती निराशाच पडली.

63 जणांचे जबाब घेतले
भादली हत्याकांडाचा गुन्हा हा पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरला असून या गुन्ह्याचा तपास होणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकरणात नशिराबाद पोलिसांनी एकूण 63 जणांचे जबाब घेतले आहेत. त्यातील काही साक्षीदारांनी दिलेले जबाब संशयास्पद आहेत. त्यामुळे त्यांची पॉलीग्राफ, ब्रेन मॅपींग, नार्कोटेस्ट करण्याची मागणी न्यायाधीश गोरे यांच्या न्यायालयात सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. स्वाती निकम यांनी केली होती. सोमवारी न्यायाधीश गोरे यांनी सरकारपक्षाची मागणी मान्य केली. त्यात ज्यांची टेस्ट होणार आहे. त्यांनी लावलेल्या खासगी वकीला समोर ही चाचणी घेण्याचे आदेश न्यायाधीश गोरे यांनी दिले आहे. या सातही जणांना मंगळवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले आहेत.