साधेपणाने दशक्रिया विधी करून मलकापूरच्या शहीद जवानाच्या कुटुंबीयास करणार मदत

0

रावेरच्या महाजन परीवाराच्या स्तुत्य निर्णयाचे समाजमनातून स्वागत

रावेर- दशक्रिया व गंधमुक्ती विधी थोडक्यात करून वाचलेली रक्कम व नातवाचा पहिल्या पगारातील काही रक्कम असे मिळून 11 हजारांचा निधी मलकापूर येथील शहीद जवान संजयसिंह राजपूत यांच्या परीवाराला सुपूर्द करण्याचा निर्णय रावेर येथील सेवानिवृत्त नगरपालिका कर्मचारी यांच्या नुकत्याच झालेल्या निधनानंतर महाजन परीवाराने घेतला आहे.

स्तुत्य निर्णयाचे सर्वत्र स्वागत
रावेर पालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी भागवत तुकाराम महाजन यांचे 11 फेब्रुवारी रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांचा बुधवारी दशक्रिया विधी व 21 फेब्रुवारी रोजी होणारा गंधमुक्ती कार्यक्रम हा थोडक्यात करून तसेच खाजगी क्षेत्रात नुकताच नोकरीस लागलेल्या नातवाच्या पगारातील काही रक्कम असा अकरा हजार रुपयांचा निधी काश्मीरमधील पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या मलकापूर येथील जवान संजयसिंह भिकमसिंह राजपूत यांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय रावेर येथील महाजन परीवाराने घेतला आहे. ही रक्कम धनादेशाद्वारे प्रत्यक्ष मलकापूर येथे जाऊन राजपूत कुटूंबियांना सुपूर्त करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी मयत भागवत महाजन यांचे मोठे भाऊ सीताराम महाजन, मुले राजू महाजन, पिंटु महाजन, नातु आकाश महाजन रावेर यांच्यासह कुटूंबातील बाळू महाजन, चेतन महाजन व उपस्थित नातेवाईक व समाजबांधव उपस्थित होते.