यावल : तालुक्यातील गिरडगाव येथे शनिवारी रात्री भला मोठा अजगर आढळून आला. त्यास रात्री कुठलीही इजा होऊ न देता पोलिसांनी पकडले व रविवारी सुखरूप वनविभागाच्या स्वाधीन केले. त्यानंतर त्यास जंगलात सोडण्यात आलेे. गिरडगाव येथील भागवत बडगु पाटील हे आपल्या शेतात रात्री 10 वाजता कांदा राखत होते. तेव्हा त्यांना हा साडेआठ फुट लांबीचा अजगर दिसला. त्यांनी पोलिस पाटील अशोक पाटील यांना याची माहिती दिली. तेव्हा पाटील यांनी यावल पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी यांना याबाबतची माहिती दिली व पोलिस निरीक्षक परदेशी यांनी सर्प मित्र युवराज रूपचंद घारूसह पोलिस कर्मचारी सुशील घुगे, राहुल चौधरी यांना सोबत घेत गिरडगाव गाठले व त्या अजगरास सुरक्षितरित्या पकडले.
अजगर वनविभागाच्या ताब्यात
पोलिस ठाण्यात या अजगरास सुरक्षित ठेवण्यात आले. वनविभागाला याबाबतची माहिती दिली. रविवारी दुपारी यावल वनविभाग पुर्व व पश्चिम क्षेत्राचे वनपाल ए.एम.खान, वनपाल एम.बी. पाटील, वनरक्षंक विलास पाटील व एन.बी. वंजारी या पथकाच्या स्वाधीन अजगरला करण्यात आले असून त्याला जंगलात सोडण्यात आले आहे.