सामन्यावर विदर्भची पकड

0

इंदूर । होळकर स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा दुसरा दिवस गोलंदाजांनी गाजवला. पहिल्या डावात विदर्भचा युवा वेगवान गोलंदाज रजनीश गुरुबानीने हॅट्ट्रिक नोंदवत रणजी करंडक स्पर्धेत इतिहास रचला. गुरुबानी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हॅट्ट्रिक मिळवणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. रजनीशने मिळवलेल्या सहा विकेट्सच्या जोरावर विदर्भने दिल्लीला पहिल्या डावात 295 धावांवर रोखले. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या विदर्भच्या फलंदाजांना दिल्लीच्या आकाश सुदान आणि नवदीप सैनीच्या घातक गोलंदाजीचा सामना करावा लागला. या दोघांनी सलामीच्या तिघा खंद्या फलंदाजांची विकेट मिळवत विदर्भला दडपणाखाली आणले. पण अनुभवी वासिम जाफरच्या अर्धशतकी खेळीमुळे दुसर्‍या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विदर्भने चार फलंदाजाच्या मोबदल्यात 206 धावा केल्या. खेळ संपला तेव्हा जाफर नाबाद 61 धावा आणि अक्शय वाखरे खाते न खोलता खेळपट्टीवर उभा होता. त्याआधी डाव पुढे नेताना ध्रुव शोरेयने दिल्लीला 250 धावांचा टप्पा गाठून दिला. पण रजनीशने दिल्लीकरांना झटका देत त्यांना 295 धावांवर रोखले.

रजनीशची हॅट्ट्रिक, 44 वर्षांनंतर कामगिरी
सामन्यातील दुसर्‍या दिवसातील पहिली विकेट रजनीशने मिळवली. डावातील 101 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने विकास मिश्राच्या दांड्या गुल केल्या. त्यानंतर पुढच्याच चेंडुवर त्याने नवदीप सैनीला खाते खोलायची संधी न देता तोच न्याय दिला. त्यानंतर 103 वे षटक टाकण्यासाठी पुन्हा चेंडु हातात घेतल्यावर रजनीशने पहिल्याच चेंडुवर 145 धावांवर खेळणार्‍या ध्रुवला बाद करत आपली हॅटट्रिक पूर्ण केली. रजनीशच्या हॅटट्रिकचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने तिघाही फलंदाजांना बोल्ड केले. रजनीशने हॅट्ट्रीकची सुरुवात सामन्याच्या दुसर्‍या दिवसाच्या अगदी सुरुवातीनंतरच केली. रणजी करंडक स्पर्धेच्या इतिहासात सुमारे 44 वर्षांनंतर अशी कामगिरी नोंदवली गेली. त्याआधी, 1973 साली, तामिळनाडूच्या बी कल्याण सुंदरमने मुंबईविरुद्धच्या अंतिम सामन्यात हॅट्ट्रिक साधली होती. सुंदरमच्या शानदार कामगिरीनंतरही तामिळनाडूच्या संघाला 123 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. उपांत्य फेरीच्या सामन्यात गुरबानीच्या कामगिरीमुळे, विदर्भाने कर्नाटकला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात, गुरबानीने 12 बळी घेतले.

जाफरने सावरले
रजनीशला यश मिळवुन देणार्‍या होळकर स्टेडियमच्या खेळपट्टीने नंतर दिल्लीच्या गोलंदाजांनाही चांगली साथ दिली. दिल्लीच्या धावसंख्येला उत्तर देताना कर्णधार फैज फैजल आणि संजय रामास्वामी या सलामीच्या जोडीने विदर्भला चांगली सुरुवात करुन दिली. पण त्यानंतर आकाशने दोन, नवदीप आणि कुलवंतने प्रत्येकी एक विकेट मिळवत विदर्भला अडचणीत आणले. आकाशने फैज आणि संजयची विकेट मिळवली. तर नवदीपने गणेश सतीश आणि कुलवंतने अप्रुव वानखेडेला बाद केले. वानखेडे आणि जाफरने 73 धावांची अर्धशतकी भागिदारी केली.