‘त्या’ स्वच्छतागृहाची लिमकामध्ये नोंद झाली पाहिजे

0

सामाजिक कार्यकर्त्याची उपरोधिक मागणी

भोसरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे दिघी येथे सार्वजनिक स्वच्छतागृह बांधून सहा महिने पूर्ण झाले. परंतु, अद्यापही दोन्ही स्वच्छतागृहांवर स्त्री किंवा पुरुषासाठी कोणते स्वच्छतागृह असा उल्लेख केला नाही किंवा चित्र लावलेले नाही. त्यामुळे महापालिका काय पोस्टर बॉईज, पोस्टर गर्लचा शोध घेत आहे काय? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संतोष वाळके यांनी केला आहे. तसेच हे काम करणार्‍याला भारतरत्न पुरस्कार द्यावा. या स्वच्छतागृहाची लिमका, गीनिज बुकमध्ये नोंद घ्यावी, अशी उपरोधिक मागणीही त्यांनी केली आहे.

सहा महिने होऊनही चित्र नाही
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सामाजिक कार्यकर्ते संतोष वाळके यांनी म्हटले आहे की, महापालिकेतर्फे दिघीगाव येथे स्त्री, पुरुष आणि तृतीय पंथियांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह बांधले आहे. अत्याधुनिक पध्दतीने स्वच्छागृहात बांधण्यात आले आहे. त्याचे काम संपवून सहा महिने झाले. परंतु, अद्यापही दोन्ही स्वच्छतागृहावर आतमध्ये स्ञी किंवा पुरूष असेल तर ते सूचित करणारी सिग्नल यंञणा बसविली नाही. स्त्रियांसाठी कोणते स्वच्छतागृह आणि षुरूषांसाठी कोणाते याचा उल्लेख अथवा चित्र देखील लावले नाही. त्यामुळे महापालिका पोश्टर बॉईज, पोश्टर गर्लचा शोध घेत आहे काय, असा संताप व्यक्त होत आहे. हे काम करणार्‍यांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे. म्हणूनच याची नोंद लिमका बुक, ग्रीनिज बुकमध्ये झाली पाहिजे, अशी उपरोधिक मागणीही त्यांनी केली आहे. या स्वच्छतागृहाचे उद्घाटन कोणत्या ग्रेट ग्रँडफादरच्या हस्ते करायचे याचेही नियोजन वेळेनुसार पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत का, असेही ते उपरोधिकपणे म्हणाले आहेत. विकासकामे करताना अभ्यास असावा लागतो. तो नसेल तर महापालिकेतील अधिकारी वर्गाला कामावर राहण्याचा अधिकार नाही. तातडीने या स्वच्छतागृहाची वर्गवारी करून स्त्रियांसाठी व पुरूषांसाठी असा उल्लेख करावा. मुतारी सुरु करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.