सामाजिक विकासापेक्षा राजकारणाला महत्त्व

0

बारामती । बारामती नगरपालिकेची विश्‍वासार्ह्यता कमी होण्याइतपत परिस्थिती का निर्माण झाली याचा विचार करण्याची वेळ आली आहे. नागरीकांच्या समस्या सुटण्याऐवजी त्यांच्यावर सातत्याने उपोषणाची वेळ येते. यावरून नगरपालिका सामाजिक विकासापेक्षा राजकारणाला जास्त महत्त्व देते आहे, असे दिसून येत आहे. जामदार रोडच्या पाईपलाईन विषयी येथील रहिवाशांना दुसर्‍यांदा उपोषण करावे लागले.

या भागातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याची व रस्त्याच्या गंभीर समस्या असूनसुध्दा नगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे. म्हणून प्रशांत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली नागरीकांनी पहिल्यांदा 43 दिवसाचे उपोषण केले होते. या उपोषणानंतर फक्त जामदार रस्त्याचीच निवीदा मंजूर करण्यात आली. पाणी पुरवठ्यासाठी पाईप लाईन टाकण्याच्या कामाबाबत नगरपालिका मौन बाळगून होती. अनामत रक्कम भरून रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. त्यानुसार कामाचा शुभारंभही झाला. मात्र, मध्येच पाईप लाईन टाकण्याचे कारण देत हे काम थांबविण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून हे काम रखडले होते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. त्यामुळे रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते.

विशेष निविदा म्हणून नगराध्यक्षांना निविदा मंजूर करण्याचे तसेच कार्योत्तर मंजुरी देण्याचे अधिकार असताना सत्ताधारी स्थानिक नगरसेवकांनी जाणूनबूजून तांत्रिक कारणे सांगून कार्योत्तर मान्यता दिली नाही. हे स्पष्ट झाल्यानंतर नगरपालिके शेजारी उपोषणाचा पर्याय येथील रहीवाशांनी स्विकारला. तरीही नगरपालिकेच्या पदाधिकार्‍यांनी या उपेाषणाकडे दुर्लक्ष केले. ही गंभीर बाब आहे. सत्ताधारी स्थानिक नगरसेवकांनी जामदार रोडच्या पाईपलाईनबाबत हा विषय आमच्या भागात असून याबाबत कोणीही लक्ष घालायचे नाही. म्हणून हा विषयच तहकूब केला ही आश्‍चर्याची बाब आहे.

अखेर प्रशासन चर्चेस तयार
या उपोषणात विरोधीपक्षनेते व नगरसेवक सुनिल सस्ते यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. उपोषणाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे लक्षात घेता प्रशासन चर्चेस तयार झाले. एवढ्या घडामोडी घडण्याची गरज नसतानादेखील नागरीकांना त्रास देऊन नगरपालिकेने काय साध्य केले. असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे. विद्यमान नगरसेवक विष्णुपंत चौधर, मुख्याधिकारी मंगेश चितळे, शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे, प्रमोद सातव, मुनिर तांबोळी, जहीर पठाण, संदिप मोहिते, युवराज तावरे, अजित बापू साळुंखे, सर्व जामदार रोडचे रहिवासी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

चार दिवसांनंतर उपोषण मागे
चार दिवसांच्या आमरण उपोषणानंतर नगरपालिकेस जाग आली. 4 जानेवारीला भारतीय जनता पार्टीच्या वरीष्ठ पातळीवरील नेत्यांनी तसेच पालकमंत्री व वरिष्ठ प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली. जामदार रोडचे पाईपलाईनचे काम सुरू करून संबंधित निविदांबाबत मंजुरी येणार्‍या जनरल सभेत देण्याबाबत पत्र देऊन उपोषण मागे घेण्याबाबत विनंती करण्यात आली. आणि उपोषण मागे घेण्यात आले.