सामाजिक संस्थांनी पालिकेत टाकला कचरा

0

भुसावळ । स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर शहरात देशभरात अस्वच्छतेच्याबाबतीत दुसरा क्रमांक आल्यानंतर शहराची बदनामी झाली. त्यानंतर शहराला लागलेला हा अस्वच्छतेचा कलंक पुसून काढण्यासाठी येथील सामाजिक संस्थांनी हाती झाडू घेत शहराचे चित्र पालटण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र स्वच्छता केल्यानंतर साधा कचरा उचलण्यासाठीदेखील नगरपालिकेचे कर्मचारी दखल घेत नसल्याने शुक्रवार 19 रोजी सकाळी नागरिकांनी हा कचराच पालिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांच्या दालनासमोर आणून तीव्र संताप व्यक्त केला़.

कचरा फेकण्यासाठी ट्रॅक्टर मिळेना
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाजवळ राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुद्देशीय फाऊंडेशन व पालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मात्र काही तासातच पालिकेचे आरोग्य अधिकारी फालक व कर्मचार्‍यांनी ट्रॅक्टर, जेसीबी व कर्मचार्‍यांना येथील काम अर्धवट टाकून निघून गेले. त्यामुळे कचरा जागेवरच पडून होता. कचरा फेकण्यासाठी ट्रॅक्टर न आल्यामुळे या अभियानात सहभागी झालेल्या संघटनांनी काही कचरा जाळला तर काही कचरा तेथेच जमा करुन ठेवला.

यांची होती उपस्थिती
यानंतर आरोग्य अधिकारी फालक यांना दूरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद येत होता. प्रसंगी राजेश्री संघमित्रा फाउंडेशनच्या राजेश्री सुरवाडे, ऑल प्युजर फाउंडेशनचे शुभम पवार, दर्शन चिंचोले, तेजस रणधीर, हर्षल चव्हाण, सुरज अवस्थी, नीतेश तेलंग यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती़.