जाधववाडीतील राहुल जाधव स्पोर्टस फाउंडेशनने केले होते आयोजन
साखरपुडा, हळदीसह सर्व विधी उत्साहात
पिंपरी-चिंचवड : लग्न घटीका साधण्यासाठी वधु-वरांची सुरु असलेली लगबग…उत्साही वर्हाडी मंडळी…मान्यवरांची जंत्री…असा उत्साहपूर्ण आणि मांगल्याने भारावलेल्या वातावरणात चिखलीत सोळा जोडप्यांची विधीवत लग्नगाठ बांधली गेली. निमित्त होते राहुलदादा जाधव स्पोर्टस फाउंडेशनतर्फे नगरसेवक राहुल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत सर्वजातीधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे.
चिखली परिसर आनंदला
जाधववाडीतील रामायण मैदानावर सर्वजातीधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रामायण मैदान विवाहासाठी आकर्षक पध्दतीने सजवण्यात आले होते. वर्हाडी मंडळींच्या उत्साहामुळे अख्खा चिखली परिसर लग्नसोहळ्याच्या आनंदात न्हाला होता. गरीबीमुळे विशेषत: मुलींना विवाहात हौसमौज करता येत नाही. याचमुळे साखरपुडा, हळद असे सर्व विधी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यानंतर विधीवत लग्न लावण्यात आले. नगरसेवक राहुल जाधव तसेच फाउंडेशनचे कार्यकर्ते जातीने सर्वत्र लक्ष घालत होते. लग्न सोहळ्यात कोणतीही उणिव राहू नये याची पुरेपूर खबरदारी घेण्यात आली होती.
संसारोपयोगी वस्तू भेट
जलसंधारणमंत्री राम शिंदे, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड, महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार तसेच नगरसेवक, नगरसेविका विविध पक्षांचे पदाधिकारी, संस्था, संघटनांचे पदाधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते. नवीन संसाराला हातभार म्हणून आयोजकांतर्फे संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या. दत्त दिगंबर नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षा मंगल जाधव यांनी संयोजनात पुढाकार घेतला. आभार नगरसेवक राहुल जाधव यांनी मानले.
…वधु-वर भारावले
हलाखीच्या परिस्थितीमुळे अनेकांना लग्नाची हौसमौज करता येत नाही. सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून समाजातील एकोपा वाढण्याबरोबरच स्वतंत्र लग्न सोहळ्यांवर होणार्या लाखोंच्या खर्चातही बचत होते, हे ओळखून जाधव स्पोर्टस फाउंडेशनने पुढाकार घेत हा सोहळा आयोजित केला होता. सर्वधर्मीयांसाठीचा हा सोहळा असल्याने विविधतेत एकता पहायला मिळाली. हा सोहळा पुर्णपणे मोफत होता.