पुणे । जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचा 3400 किमीचा 13 राज्यातून प्रवास… तोही सायकलवरून आणि 14 वर्षांच्या मुली व पत्नीसह. सतीश पाटील यांनी ही अनोखी व साहसी प्रवास यात्रा 30 दिवसांत सायकलवरून केली. दररोज कमीत कमी 100 व जास्तीत जास्त 170 किमीचा प्रवास त्यांनी केला. देशात पहिल्यांदाच अशाप्रकारचा व इतका मोठा प्रवास सायकलवरून झाला आहे. याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये होत आहे.
सतीश पाटील हे व्यावसायिक असून ते हिंजवडीत राहतात. 15 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2017 दरम्यान त्यांनी हा प्रवास पूर्ण केला. जम्मू येथून प्रवासास सुरुवात केली आणि पुढे लुधियाना, पानीपत, दिल्ली, आग्रा, मथुरा, ग्वाल्हेर, लांजीतपूर, छिंदवाडा, नागपूर, हैदराबाद, बंगळुरु, सालेम, कन्याकुमारी असा हा प्रवास झाला. एकूण 13 राज्यातून हा प्रवास झाला. त्यामध्ये जम्मू-काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे.
दरवर्षी आम्ही काहीतरी साहसी करायचो. यावर्षी कुटुंबासोबत प्रवास करून त्यांचा आत्मविश्वास वाढविणे, स्त्री-पुरुष समानता व फॅमिली फिटनेसचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ही प्रवास यात्रा केली. यामध्ये रिस्क वाटली नाही. सगळीकडे चांगली माणसं असतात. थोडी काळजी घेतली आणि चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी थांबणे टाळले तर, सहसा कोणतीच अडचण येत नाही. यापूर्वी छोट्या-मोठ्या सहलींचा अनुभव असल्याने या प्रवासाबाबत भीती वाटली नाही.
हा प्रवास करण्यापूर्वी सायकल चालविण्याचा सराव केला. जिममध्ये फिटनेस वाढविला. डायट व्यवस्थित ठेवला. साधारणपणे एक ते दीड महिना अगोदर सराव सुरु केला. मानसिक तयारीसाठी 25, 50, 100 किमीच्या टप्प्यात वाढ करीत सायकल चालविण्याचा सराव केला. एका दिवसात 100 किमीचा प्रवास झाल्यानंतर मानसिकदृष्ट्या जम्मू ते कन्याकुमारी अंतर सायकलवर पार करू असा आत्मविश्वास मिळाला. तसेच, यापूर्वी पुणे ते गोवा हा प्रवास सायकलने मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये केला असल्याचेही पाटील यांनी सांगितले.