नेरुळ । सायन पनवेल महामार्गावरील नेरुळ येथे एलपी ते उरणनाका पुलापर्यंत धुळीचे साम्राज्य पसरलेले दिवसभर पाहायला मिळत आहे. एलपी येथून बेलापूरकडे जाताना सकाळी जणू काही गडद धुके पसरले आहे. अशी परिस्थिती संपूर्ण मार्गावर दिसत आहे. मात्र काही अंतर पार केल्यावर डी. वाय. पाटील स्टेडियामजवळ गेल्यावर महामार्गावर पडलेल्या लाल मातीमुळे हे धुरकट वातावरण तयार झाल्याची माहिती देण्यात आली. या महा मार्गावरून अनेक अवजड वाहने जात असल्याने एखाद्या ट्रकमधून मोठ्या प्रमाणात लाल माती सांडल्याने हा प्रकार घडल्याचे उघड झाले. मात्र याचा फटका चारचाकी वाहनांना व बाईक स्वारांना बसत असल्याचे दिसून येत आहे. धुळीचे लोट हवेत पसरत आहेत. त्यामुळे समोरील 10 फुटांवरील काहीही दिसत नव्हते इतकी धूळ वातावरणात पसरली होती.
वाहतूक पोलीस नसल्याने अपघाताची होण्याची शक्यता
चारचाकी व अवजड वाहनांमुळे व वार्यांमुळे धूळ आणखीन उडत असल्यामुळे व समोरील काहीही दिसत नसल्याने बाईकस्वार मात्र काही ठिकाणी थांबून तर काही बाईकस्वार रस्त्याच्या कडेने 10 ते 20 की. मी. प्रति तास या वेगाने गाडी चालवत होते. त्यामुळे एखादे वाहन येऊन दुसर्या वाहनाला धडकेल की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. वाहने नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलीस नसल्याने काही काळ अपघात होतेय की काय? अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र सुदैवाने कोणताही अपघात झाला नाही. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दिल्ली-आग्रा महामार्गावरील धुक्यामुळे एकमेकांवर आदळून झालेल्या विचित्र अपघाताच्या व्हिडिओचे उदाहरण देत बाईकस्वार वाहनचालकांना गाडी हळू चालवण्याचे आवाहन करत होते. मात्र यामुळे काही काळ गाड्यांचा खोळंबा झाल्याचे चित्र दिसत होते.