खाडीत पडून अपघात होण्याची शक्यता; स्त्याच्या कडेला लावण्यात आलेले सुरक्षा खांबांची दुरवस्था
नवी मुंबई । सायन पनवेल महामार्गावर वाशी कडूनमुंबईला जाताना टोल जवळ रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले सुरक्षा खांबांची दुरवस्था झाली आहे. हे खांब तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे व बाजूला खाडीचा खोल भाग आल्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. सायन पनवेल महामार्गाचे रुंदीकरण झाल्यावर हा मार्ग संपूर्णपणे काँक्रीटचा बनवण्यात आला आहे. सायन पनवेल महामार्ग हा राज्यातील सर्वाधिक रहदारीचा मार्ग असल्यामुळे येथे दिवसभर वाहनांची वर्दळ असते. लाखो नागरिक येथून दररोज ये जा करत असतात. चारचाकी गाड्यांबरोबरच येथून दुचाकीने प्रवास करणार्यांची संख्या मोठी आहे. मोटरसायकलने जाताना टोल नाक्याच्या आधी रस्त्याच्या कडेला लोखंडी पाईप सुरक्षा म्हणून लावलेले आहेत. जेणेकरून कोणतेही वाहन बाजूलाच असलेल्या खाडीत पडू नये. मात्र हे पाईपच आता गायब होऊ लागले आहेत. त्यामुळे येथे अपघातांची शक्यता वाढलेली आहे. टोल नाक्यावर चार चाकी वाहनांसाठी रांगा आहेत. मात्र रस्ता जिथे संपतो त्याठिकाणी खाडीच्या बाजूने बाईकस्वार आपली वाट काढत जात असतात.
चार चाकी वाहनांना मोठ्या रांगा ठेवून मोटरसायकलस्वाराना मात्र लहान रांग
याठिकाणी सुरक्षेसाठी लावलेले पाईप नसल्यामुळे कित्येक जण तोल जाता जाता बचावले आहेत. तर हल्लीच एका मोटरसायकलस्वाराचे या ठिकाणी तोल जाऊन हेल्मेट खाडीत पडल्याचा प्रकार घडला होता. कित्येक मोटरसायकलस्वार आपल्या बायका मुलांसह येथून प्रवास करताना दिसतात. मात्र खाडीकिनारी तुटलेले खांब धोकादायक ठरत आहेत. या ठिकाणी मोटार सायकलस्वारांच्या अनेक तक्रारी आहेत. चार चाकी वाहनांना मोठ्या रांगा ठेवून मोटरसायकलस्वाराना मात्र लहान रंग ठेवली जाते तीही खाडीच्या कडेला. त्यामुळे मिळेल त्या जागेने जाणारा मोटरसायकलस्वार तोल जाऊन येथे पडू शकतो. असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. हे लोखंडी पाईप सुरक्षेसाठी बसवलेले आहेत. मात्र हे पाईपच येथून काढून किंवा चोरून नेण्यात येत आहेत. कित्येक पाईप हे अर्धवट कापलेल्या अवस्थेत आहेत. तर काही पाईप वाकवून तोडण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
कायमस्वरूपी व्यवस्था करावी
याबाबत येथील टोल नाक्यावरील अधिकार्यांना विचारले असता त्यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे बोट दाखवण्यात येत आहे. मात्र २४ तास वर्दळीचा असलेल्या या मार्गावर मात्र हे खांब कोण चोरत असावे याचा संशय येत आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेल्या या महामार्गावर प्रवाशांच्या जीवाला धोका ओळखून सुरक्षेसाठी कायमस्वरूपी व्यवस्था शासन का करू शकत नाही असा प्रश्न येथे निर्माण झाला आहे.
मुळात महामार्ग देखभालीचे काम टोलवेज या कंपनीला सोपविलेले आहे. मात्र मात्र याठिकाणी अजून कोणाच्याही तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत.यासंदर्भात आम्ही तुर्भे येथे असलेल्या सार्वजनिक बांधकाम कार्यालयात तसेच टोलवेज कंपनीला पत्र पाठवून दुरुस्ती करण्याविषयी तातडीने सांगू. -प्रसाद संगर, कनिष्ठ विभाग अधिकारी
सार्वजनिक बांधकाम विभाग (कुर्ला)
मी येथून दररोज प्रवास करतो. टोल नाक्यावर गर्दीच्यावेळेस आम्हाला जागा नसल्यामुळे खाडीच्याबाजूने वाट काढत जावे।लागते. मात्र येथे सुरक्षा म्हणून लावण्यात आलेले खांब तुटलेले आहेत.तर याबाजूला रेती पडलेली असते.त्यामुळे त्यावरून घसरून कोणीही खाडीत पडण्याचा संभव आहे.शासनाने त्वरित येथे लक्ष द्यावे. -शशिकांत अंभोरे, (मोटारसायकल प्रवासी, नेरुळ)