सद्याच्या डिजिटल युगामध्ये सायबर क्राइमचे प्रमाण वाढत आहे. नेटवर्किंगच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्हे हे आपल्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत पोहोचले आहेत. दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारी वाढत आहे. त्याला बळी पडणार्या नागरिकांची संख्याही वाढत आहे. या गुन्ह्यांची शोध घेणारी यंत्रणा पोलिसांनी प्रभावीपणे कार्यान्वित केली आहे. महाराष्ट्रातील सर्वांत मोठी सायबर लॅब ठाणे शहर आयुक्ताच्या कार्यालयात सुरू करण्यात आली आहे.
सोशल मीडिया संबंधित गुन्हे- आपले फोटो, पासवर्ड, फोन नंबर व कुटुंबाची माहिती यांसारख्या व्यक्तिगत गोष्टी सोशल मीडियावर शेअर करू नका. सोशल मीडियावर ओळख झालेल्या अनोळखी व्यक्तीला प्रत्यक्षात एकटे व अज्ञात ठिकाणी भेटू नका. सोशल मीडियावर आक्षेपार्ह, भडकावू संदेश पाठवू नका. त्याचप्रमाणे अश्लील चित्रे/चित्रफिती पाठवू नका. हा कायद्याने गुन्हा आहे. इंटरनेटवरून पायरेटेड चित्रपट, गाणी, गेम्स आणि व्हिडिओ डाऊनलोड करू नका. नेट बँकिंग व ई-मेलचे पासवर्ड वरचेवर बदलत राहा. आपला पासवर्ड किमान 8 अक्षरांचा असावा ज्यात इंग्रजीतील लहान मोठी अक्षरे, चिन्हे व अंकाचा समावेश असावा. आपला वाय-फाय चांगल्या पासवर्डने सुरक्षित ठेवा आणि त्याचे लॉग इन कलेक्शन चालू ठेवून ते वरचेवर तपासा.
क्रेडिट/डेबिट कार्ड फसवणूक
आपल्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा 16 अंकी क्रमांक तसेच पिन नंबर, कार्डच्या मागील 3 अंकी सीव्हीव्ही नंबर किंवा आपली व्यक्तिगत माहिती फोन किंवा ई-मेलवरून कोणालाही देऊ नका. आपले डेबिट कार्ड रद्द होणार आहे किंवा आपले केवायसी अद्ययावत करावयाचे आहे असे सांगून भामटे तुमची माहिती काढून घेतात. आपला ओटीपी क्रमांक कोणालाही सांगू नका. तो ऑनलाइन फसवणुकीच्या व्यवहारांसाठी वापरला जाऊ शकतो. आपला मोबाइल नंबर बँक खात्याशी संलग्न करा. जेणेकरून बँकेच्या व्यवहाराची माहिती त्वरित आपणास मोबाइल मेसेजद्वारे समजेल. एटीएम मशीनमध्ये पिन टाकताना तो कोणीही पाहणार नाही त्यासाठी आपल्या हातावर दुसरा हात किंवा पेपर आडवा धरावा. एटीएम सेंटरमध्ये पैसे काढताना अन्य कोणालाही आत येण्यास मज्जाव करा. नेट बँकिंग किंवा क्रेडिट/डेबिट कार्डचे व्यवहार सायबर कॅफे किंवा फ्री वायफायच्या ठिकाणी करू नका.
पोन्झी (डबल मनी ) फसवणूक
अल्पावधीत पैसे दुप्पट करून देणार, दामदुप्पट व्याज देऊन आपली गुंतवणूक पुन्हा पुन्हा वाढवून देणार अशी आश्वासने देणार्या पोन्झी (डबल मनी) योजनांना भुलू नका. पोकळ आश्वासने व अफवांवर विश्वास ठेवून गुंतवणूक करू नका. गुंतवणुकीबाबत कागदपत्रे वाचल्याशिवाय व त्यातील फायदे तोटे व धोका समजून घेतल्याशिवाय गुंतवणूक करू नका. आपली सर्व गुंतवणक बँकिंगशी संबंध नसलेल्या वित्तीय कंपन्यात करू नका. ज्या सेबी किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी संलग्न नाहीत. नवीन स्थापन झालेल्या कंपन्या तसेच बँकिंगशी संबंध नसलेल्या वित्तीय कंपन्यांची बाजारातील पत पडताळणी केल्याशिवाय दीर्घ मुदतीच्या गुंतवणुका करू नका. काहीही फसवणूक झाल्यास तत्काळ नजीकच्या पोलीस ठाणे किंवा आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क करा.
इतर सायबर गुन्हे
परदेशात किंवा चांगल्या पगाराची नोकरी, मोठ्या रकमेची लॉटरी किंवा बक्षीस आणि मृत्युपत्राद्वारे मोठ्या रकमेचे आमिषबाबत फोन/एसएमएसद्वारे आपली फसवणूक होऊ शकते. वरील संदेशांना भुलून जाऊन कोणत्याही अन्य खात्यांवर पैसे पाठवू नका. नेहमी सर्च करावयाच्या वेबसाइटचे अचूक नाव टाइप करून इंटरनेटवर सर्च करा. ई-मेलला उत्तर पाठवण्यापूर्वी ई-मेल ड्रेस बारकाईने तपासा. एकसारख्या दिसणार्या ई-मेलवर लॉगइन करून माहिती दिल्यास आपल्या माहितीचा आर्थिक व अन्य फसवणुकीसाठी गैरवापर होऊ शकतो. ईमेलचा व नेट बँकिंगचा पासवर्ड वेगवेगळा ठेवा. आपले बँकेचे व्यवहार नियमितपणे तपासा. अचानकपणे आपला मोबाइल फोन डिक्टिवेट झाल्यास त्वरित मोबाइल कंपनीशी संपर्क करून माहिती घ्यावी. आपला फोन बंद असताना ड्युप्लिकेट सिम कार्ड घेऊन आपल्या खात्यातील पैसे नेट बँकिंगद्वारे काढले जाऊ शकतात.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सायबर पोलीस ठाणे निर्माण करून सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक ठिकाणी सायबर प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये या गुन्ह्यांचे विश्लेषण करून गुन्ह्याची पद्धत, कल, तंत्र आदीचा अभ्यास करून अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. सायबर सेल तसेच सायबर पोलीस ठाणे निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.
– शैलेजा पाटील-देशमुख
विभागीय माहिती कार्यालय,कोकण भवन, नवी मुंबई.