सारंगी यांच्या आरोपांना प्रकाश महाजनांचे उत्तर, कौटुंबिक वाद चिघळला
औरंगाबाद । भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येप्रकरणी गोपीनाथ मुंडे यांनी प्रवीण महाजनांविरोधात साक्ष दिली होती. मुंडेंच्याच साक्षीमुळे प्रवीण महाजन यांना जन्मठेप झाली. याचा राग अजूनही सारंगी महाजन यांच्या मनात कायम आहे. त्यामुळेच त्या मुंडेंविरोधात बेछूट आरोप करत असल्याचा दावा प्रकाश महाजन यांनी केला आहे. सारंगी या स्वत:ला प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. सहानुभूती मिळवण्यासाठी त्या असले घाणेरडे आरोप करत असल्याचे प्रकाश महाजन यांनी वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले. सारंगी महाजन यांनी शनिवारी महाजन कुटुंबियांवर गंभीर आरोप केले होते. तसेच प्रविण यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचे म्हटले होते. यावरून आता महाजन कुटुंबियांमधील वाद चिघळण्याची शक्यता आहे.
आत्मचरित्राला त्याच भाषेत उत्तर देऊ
महाजन म्हणाले, प्रमोद महाजन यांच्या हत्येप्रकरणी गोपीनाथ मुंडेंच्याच साक्षीमुळे प्रवीण महाजन यांना जन्मठेप झाली. त्यामुळेच सारंगी महाजन मुंडेंचा राग आहे. यापूर्वीही त्यांनी मुंडेंचा नामोल्लेख प्रादेशिक नेते म्हणून केला होता. सारंगी यांनी आत्मचरित्र जरुर लिहावे, परंतु त्या पुस्तकातील संदर्भ चुकीचे असल्यास सारंगी यांना त्याच शब्दात उत्तर दिले जाईल, असेही महाजन म्हणाले.
माझा लढा कायदेशीर
दरम्यान, प्रवीण महाजन यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी शनिवारी केला. उस्मानाबाद येथे जमीन प्रकरणाच्या सुनावणीसाठी आलेल्या सारंगी महाजन यांनी जमीन प्रकरणातून अंग काढावे म्हणून पूनम महाजन यांचा पीए धमक्या देत असल्याचा आरोपही केला होता. वारसा हक्काने महाजन कुटुंबियांकडे असलेली जमीन प्रवीण महाजन यांना न विचारता ट्रस्टला देण्यात आली. वारसाहक्काची जमीन माझ्या मुलांना मिळावी, म्हणून मी कायदेशीर लढा देत आहे आणि माझ्या मुलांना जमिनीचा हक्क मिळवून देणारच, असे सारंगी महाजन म्हणाल्या होत्या.