सारथी हेल्पलाईन बोगस !

0

महापालिका प्रवेशव्दारावर अनोखी पाटी लावून उडविली खिल्ली

पिंपरी-चिंचवड : महापालिकेने नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी सुरू केलेल्या सारथी हेल्पलाईनकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. ही बाब सध्या महापालिका भवनासमोर लागलेल्या एका पाटीमुळे समोर आली आहे. अर्धवट कामांना वैतागलेल्या एका सुजाण नागरिकाने ‘जनता की मन की बात’ अशी ही पाटी लावली असून त्यावर सारथी हेल्पलाईन बोगस असल्याची जाहीर तक्रार केली आहे.

प्रत्येक आयुक्ताकडून दुर्लक्ष
तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून 15 ऑगस्ट 2013 रोजी सारथी हेल्पलाईन सुरू झाली. डॉ. परदेशी यांची काही दिवसानंतर मुदतपूर्व बदली झाली. त्यांच्यानंतर आलेल्या आयुक्त राजीव जाधव यांनी सारथीकडे दुर्लक्ष केले. पुढे दिनेश वाघमारे आणि आता श्रावण हर्डीकर यांनी आयुक्त म्हणून सारथीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या सारथीकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष होत आहे. तसाच एक प्रकार महापालिकेसमोर टांगलेल्या पाटीमुळे समोर आला आहे.

‘जनता के मन की बात’
महापालिका भवनाच्या बाहेर अधिकारी, कर्मचा-यांचा राबता असलेल्या ठिकाणी प्रवेशव्दाराजवळ ही पाटी लावलेली आहे. ती अर्धवट कामांमुळे वैतागलेल्या एका नागरिकाने लावली असून त्यावर जनता के मन की बात असे शीर्षक दिले आहे. पूर्णनगरमध्ये चेंबरचे काम, डांबरी, सिमेंट क्रॉकेटचे खराब रस्त्यांची तक्रार या नागरिकाने मांडली आहे. त्यातच पालिकेची सारथी हेल्पलाईन एकदम बोगस असल्याचा आरोप या नागरिकाने केला आहे. प्रवेशव्दारावर टांगलेली ही पाटील महापालिका आयुक्तांसह संपूर्ण प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.

सारथीकडे अक्षम्य दुर्लक्ष
एकीकडे झिरो पेंन्डन्सीचा नारा देणारी महापालिका गतिमान प्रशासनासाठी दुवा ठरणार्‍या सारथीकडे दुर्लक्ष करीत असल्याने अशा तक्रारी पुढे येतात. सारथीवरून नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद मिळत नसून त्यांचा निपटाराही होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरिकांना उपयोगी ठरणार्‍या ’सारथी’ चे सारथ्य कोण करणार असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.