अंबरनाथ । अनेक संकटांचा आणि नैसर्गिक आपत्तींचा सामना करत आयुष्य जगणार्या शेतकर्यांचे मनोधैर्य खचत आहे. सामुदायिक विवाह सोहळ्यांमुळे मात्र समाजातील गरीब, गरजु आदिवासी आणि शेतकरी यांच्यात सामाजिक परिवर्तन होईल असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी आदीवासींच्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या उपस्थिती दरम्यान केले. अंबरनाथ येथील चिखलोली येथे सारा आधार फाउंडेशन या संस्थेच्या वतीने या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सध्या राज्य आणि देशात हजारो शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत असल्याचे भीषण वास्तव समाजात दिसत आहे. त्यात अशा अनेक शेतकर्यांच्या आणि आदिवासी कुटुंबातील मुलामुलींवर पित्याचा हात नसल्याने आर्थिक परिस्थिती अभावी समाजातील अनेक मुली मुलांचे विवाह करण्यात शेतकरी कुटुंबासमोर अडचणी येत आहेत. त्यामुळे समाजातील अशा वंचित आणि गरीब आदिवासी कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी किशोर सोरखादे, रवींद्र थोरवे या तरूणांनी पुढाकार घेत ठाणे, रायगड या जिल्ह्यातील 30 आदिवासी जोडप्यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते.
शाही पद्धतीने आतषबाजी व बॅन्डबाजासह रथातून मिरवणूक
अंबरनाथमधील चिखलोलीतील ठाकूरपाडा या आदिवासी वाडीतील पटांगणात हा विवाह सोहळा पार पडला. या विवाहात सोहळ्यात जोडप्यांमधील वधूंना मंगळसूत्र, वधूवर दोघांना लग्नाचे कपडे, येण्या जाण्याचा खर्च, लग्न लागल्यानंतर शाही पध्दतीने आतषबाजी बॅन्डबाजा लावत रथातून मिरणुकीत काढण्यात आली होती. या विवाह सोहळ्यातील नवविवाहित वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी अनाथांची माय तसेच ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ या प्रमुख अतिथि म्हणून उपस्थित होत्या. जोडप्यांसाठी मोफत विवाह सोहळ्यातून समाजात एक उत्तम आदर्श निर्माण झाला आहे. विवाहानंतर नव विवाहित जोडप्यांनी समाजातील चांगल्या घटकांची जाणीव ठेवून आदर्श जीवन जगण्याचा मंत्र सिंधुताई सपकाळ यांनी दिला. अभिनेत्री दिप्ती भागवत, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगरसेवक उमेश गुंजाळ आदी उपस्थित होते.