सारे सुन्न करणारे

0

हरियाणातल्या गुरूग्राममधील रायन इंटरनॅशनल या स्कूलमध्ये 7 सप्टेंबर रोजी प्रद्युम्न ठाकूर या सात वर्षांच्या विद्यार्थ्याचा गळा कापलेल्या अवस्थेतील मृतदेह शाळेच्या शौचालयात आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असणार्‍या एखाद्या शाळेत अशा प्रकारचे कृत्य झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. हरियाणा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून अशोक कुमार या रायन स्कूल बसच्या कंडक्टरला अटक केली होती. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुलीदेखील दिली. विशेष बाब म्हणजे अगदी दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या कॅमेर्‍यासमोर त्याने अगदी निर्विकारपणे आपण चुकीचे कृत्य करत असल्याचे प्रद्युम्नने पाहिल्यामुळे त्याला ठार मारल्याची कबुली दिली. मात्र, इतक्या सहजासहजी या खुनाचा झालेला उलगडा हा अनेकांना चक्रावून टाकणारा होता. विशेषत: अशोकने खुनाची कबुली दिली होती. तथापि, बस ड्रायव्हर आणि इतरांनी याला दुजोरा दिला नव्हता. यामुळे या प्रकरणात काही तरी पाणी मुरत असल्याची चर्चा सुरू झाली होती. एक तर पोलिसांनी अशोक कुमारवर दडपण टाकून त्याच्याकडून गुन्ह्याची कबुली घेतल्याची शक्यता होती. त्याच्या पत्नीनेही हाच आरोप केला होता, तर रायन स्कूलच्या व्यवस्थापनाने या प्रकरणावर तातडीने पडदा टाकण्यासाठी अशोकला पैशांचे आमिष दाखवून त्याला हा गुन्हा कबूल करायला लावल्याची दुसरी शक्यतादेखील होती. यामुळे मृत प्रद्युम्नच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाला सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करण्याची मागणी केली होती. हरियाणा सरकारने याबाबत टाळाटाळ करण्याची भूमिका लक्षात येताच त्यांनी न्यायालयातून ही मागणी मान्य करून घेतली होती आणि सीबीआयच्या पथकाने केलेल्या चौकशीतून या प्रकरणातील दुसरा पदर उलगडण्यात यश आले आहे. अर्थात यातून समोर आलेले सत्य हे सर्वांना हादरा देणारे ठरले आहे.

सीबीआयच्या पथकाच्या दाव्यानुसार प्रद्युम्नचा खून हा त्याच शाळेत अकरावीत शिकणार्‍या एका विद्यार्थ्याने केला आहे. पेपरच्या दिवशी शाळेला सुटी मिळावी तसेच शिक्षक-पालक सभा पुढे ढकलण्यात यावी म्हणून त्याने निष्पाप प्रद्युम्नचा बळी घेतल्याचा दावा सीबीआयने केला आहे. यातून संबंधित गुन्हेगार विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले असून, बाल न्यायालयात सादर करण्यात आले आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक पैलू हा त्या विद्यार्थ्याने खुनासाठी दिलेल्या कारणाच्या माध्यमातून आपल्यासमोर आले आहे. इतक्या क्षुल्लक कारणासाठी अवघ्या 16 वर्षांचा विद्यार्थी हा एखाद्या बालकाच्या जीवावर कसा उठू शकतो? हा प्रश्‍न समाजमनाला सुन्न करणारा आहे. अलीकडच्या काळात बालकांच्या वर्तनात अनेक बदल होऊ लागले आहेत. यातून आत्मघातकी प्रवृत्तीदेखील वाढीस लागली आहे. अगदी अबोध अवस्थेत असणारी बालके वा कुमारवयीन विद्यार्थी दूरचित्रवाणी वाहिन्या आणि इंटरनेटच्या मायावी विश्‍वात वास्तव हे विकृत स्वरूपात पाहतात. यातून जीवनात काही तरी थ्रील असावे म्हणून ते कोणतेही दु:साहस करण्यास प्रवृत्त होत असल्याची बाब अलीकडच्या कालखंडात ब्लू व्हेल चॅलेंज या आत्मघाती गेमच्या प्रसारातून दिसून आली आहे. महानगरांमध्येच नव्हे तर अगदी गाव पातळीवरही या गेमने तरुणाईला विळखा घातल्याची बाब अत्यंत धक्कादायक आहे. थ्रीलच्या नावाखाली आत्मघाताला कवटाळणारी आणि अगदी साध्या कारणासाठी कुणाचाही अकारण खून करण्याची प्रवृत्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू समजल्या पाहिजे. अर्थात याला आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्याची गरजदेखील यातून अधोरेखित झाली आहे. बाल गुन्हेगारी हादेखील अतिशय चिंताजनक असा विषय आहे. मुळात विद्यमान कायद्यानुसार प्रद्युम्नचा खून करणार्‍या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त तीन वर्षे बालसुधारगृहात काढावी लागली. म्हणजे तो एकोणीस वर्षाचा होईल तेव्हा पुन्हा बाह्य जगात वावरू शकेल. निर्भया प्रकरणातील सर्वात क्रूर कृत्य करणारा आरोपीदेखील वयाचा लाभ उचलत याच पद्धतीने बाल सुधारगृहातून बाहेर आला आहे. अलीकडच्या काही घटनांचा मागोवा घेतला असता 16 ते 18 या वयोगटातील मुले गुन्हेगारीकडे मोठ्या प्रमाणात वळत असल्याचे दिसून येते. यातच बाल कायद्यातील त्रुटींचा लाभ घेत ते लवकरच बाहेर येत असतात, तर काही टोळी अतिशय चलाखीने मुलांच्या माध्यमातून विविध गुन्हे करत असल्याचेही दिसून आले आहे. प्रद्युम्नच्या हत्येचा गुंता सुटल्यानंतर बाल गुन्हेगारीबाबत पुन्हा नव्याने विचार व्हावा ही अपेक्षा करणे नक्कीच गैर नाही. प्रद्युम्नच्या खून प्रकरणातील दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे हरियाणा पोलिसांनी केलेला तपास होय. देशात अनेकदा पोलीस अत्याचाराच्या घटना समोर येत असतात. बुधवारीच सांगली पोलिसांनी एका संशयिताला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची उघडकीस आलेली घटना चांगलीच खळबळ उडवून देणारी ठरली आहे. अनेकदा काही गुन्ह्यांमध्ये कबुलीचे फिक्सिंग करण्यात येत असते. यानुसार रायन इंटरनॅशनल स्कूलने पैशांचे आमिष दाखवून अशोक कुमारला गुन्हा कबूल करायला लावला की, वाढता जनप्रक्षोभ पाहता हरियाणा पोलिसांनी त्याच्यावर दबाव टाकला? या प्रश्‍नांची उकल होणे आता गरजेचे आहे. विशेष करून अशोकला मीडियासमोर उभे राहून थेट खून का आणि कसा केला? याचा जबाब द्यायला लावण्याची पद्धतदेखील संशयकल्लोळास जन्म देणारी ठरली आहे. यातून शालेय व्यवस्थापनाची सारे काही मॅनेज करण्याचा आविर्भाव अथवा पोलिसांची दंडेलशाही या बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच प्रद्युम्नच्या हत्येप्रकरणी सीबीआयच्या पथकाने केलेला उलगडा हा जितका महत्त्वाचा आहे तितकाच अशोककुमारच्या आधीच्या कबुलीजबाबातील गुढदेखील समोर येण्याची आवश्यकता आहे. असे झाल्यास अजून एखादी धक्कादायक बाब समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे रहस्योद्घाटन व्हावे हीच अपेक्षा. अर्थात हे सर्वच प्रकरण अतिशय भयंकर असल्याची बाब निश्‍चितपणे अधोरेखित झाली आहे.