सारोळा जलशुध्दीकरण केंद्रातील पंप पुन्हा नादुरुस्त

0

बोदवड। ओडीए योजनेच्या सारोळा जलशुद्धीकरण केंद्रावर आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून 120 अश्वशक्ती (एचपी)चे दोन नवीन पंप बसवण्यात आले होते. मात्र, या नवीन पंपांमध्ये आतापर्यंत तीनवेळा बिघाड झाल्याने अपेक्षित क्षमतेने पाणी उचल होत नाही. आताही एक पंप बंद पडल्याने दोन दिवसांपासून ओडीए योजना बंद आहे. यामुळे नवीन पंप खरेदीविषयी दबक्या आवाजात शंकेचे सूर उमटत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून सुरळीत असलेल्या ओडीए योजनेला ऐन उन्हाळ्यात पुन्हा तांत्रिक दोषांचे ग्रहण लागले आहे.

पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक झाले विस्कळीत
गेल्या दोन दिवसांपासून सारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील 120 अश्वशक्तीच्या दोनपैकी एक पंप नादुरुस्त झाला आहे. परिणामी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. दोन महिन्यांपूर्वीच या नवीन पंपात दोष निर्माण झाल्याने दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, आता सलग तिसर्‍यांदा पंपात बिघाड झाला आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने कोट्यवधी रुपये खर्च करून जालना येथील मोर कॉन्ट्रॅक्टरकडून नवीन पंप बसवून घेतले होते. मात्र, आठ महिन्यात तीनवेळा झालेला बिघाड पाहता संपूर्ण प्रक्रियेत ’पाणी मुरले’ की काय? अशी शंका निर्माण होत आहे. विशेष म्हणजे नवीन पंप खरेदीवर मोठा खर्च झालेला असताना आता पुन्हा याच पंपांच्या दुरुस्तीवर शासनाचा पैसा वाया जातो. एवढे करूनही अवलंबून असलेल्या गावांना पाणी मिळत नाही. त्यामुळे पंप खरेदीची चौकशी गरजेची आहे.