सार्वजनिक बांधकाम विभाग व रस्त्यावरील खड्डेताईंच्या जुळूनी येती रेशीम गाठी!

0

कामशेत : आतापर्यंत आपण बरेच विवाह सोहळे पाहिले आहेत. परंतु, एखाद्या खड्ड्याचा चक्क महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाशी विवाह झाल्याचे ऐकीवात नाही. असा विवाह सोहळा आपण कधीही पाहिलेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे खड्ड्यांशी असलेले प्रेम पाहता त्यांचा विवाहच लावून देण्याचा विचार कामशेत युवक काँग्रेसने केला आहे. त्यानुसार, या विवाह सोहळ्याची लग्नपत्रिका, इतर सर्व तयारी पूर्ण झाली आहे. हा विवाह सोहळा आज, (दि. 24) रोजी सकाळी 11 वाजता कामशेतला पार पडणार आहे. रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीची वारंवार मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीचा निषेध नोंदविण्यासाठी युवक काँग्रेसने हे आगळेवेगळे पाऊस उचलले आहे. या विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे.

पाहुणे मंडळीही हटके
हा विवाह आहे महाराष्ट्र राज्य शासनाचे कनिष्ठ चिरंजीव म्हणजेच वडगाव मावळचे सार्वजनिक बांधकाम विभाग खाते व मावळातील सर्व रस्त्यांची कनिष्ठ कन्या खड्डेताई यांचा. अशा आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याची पत्रिका व पाहुणे मंडळीदेखील हटकेच आहेत. लग्नपत्रिकेच्या सुरुवातीलाच त्यांनी खड्ड्याचे व वडगाव मावळच्या बांधकाम विभागाचे नाते सविस्तरपणे सांगितले आहे. अर्थात हा प्रेम विवाह आहे. यामध्ये रस्ते तयार झाले नाही; तोपर्यंत तेथे खड्डे तयार होतात. बांधकाम विभाग व खड्डेताई एक क्षणसुद्धा एकमेकांशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यातील हे प्रेम पाहता हा विवाह लावून देण्यात येणार असल्याचे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

ठेकेदार मंडळी सोहळ्याचे मध्यस्थ!
हा विवाह सोहळा वधू-वराच्या निवासस्थानी म्हणजेच, कामशेत येथील शिवाजी चौकाच्या मध्यस्थानी गुरुवारी सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे. या विवाह सोहळ्याचे मध्यस्थ बांधकाम विभागाचे सर्व ठेकेदार मंडळी आहेत. तर ‘नुसतीच लुडबूड’मध्ये खडी, वाळू, सिमेंट, मुरूम असे छोटे निमंत्रक असणार आहेत. प्रमुख निमंत्रक म्हणून मावळ तालुक्यातील काँग्रेस, मनसे, शिवसेना, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी असणार आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व नागरिकांनी या आगळ्या-वेगळ्या सोहळ्याला उपस्थिती लावून लग्नाची शोभा वाढवावी व वधू-वरास पुढील संसारासाठी आशीर्वाद द्यावेत, असे निमंत्रण निमंत्रकांनी दिले आहे.