नूतन मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांचा ईशारा
भुसावळ- शहरातील गणेशोत्सव, दुर्गोत्सव, मोहरम आदी धार्मिक सण व उत्सवांत सार्वजनिक मंडळांकडून मंडप उभारणी केली जाते. यामुळे काही ठिकाणी वाहतुकीचा रस्ता पूर्णपणे बंद होऊन अडचण निर्माण होते. त्यामुळे रस्ता अडवणार्यांवर आता पालिकेकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी एका पत्रकान्वये दिला आहे. शहरातील सार्वजनिक सण उत्सवात रस्त्यावर मांडव किंवा सजावट करून रस्ते वाहतुकीसाठी बंद केले जातात. याबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत असून यामुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार मंडप टाकताना रस्ता नागरीकांच्या वाहतुकीसाठी मोकळा असणे गरजेचे आहे. त्यामुळे मंडळांच्या पदाधिकार्यांनी न्यायालयाच्या आदेशांचा अवमान करू नये, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास गुन्हा होणार दाखल
मुख्याधिकार्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रानुसार मंडपाची उभारणी करताना रहदारीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच नगरपरीषदेची रीतसर फी भरून मंडपाची परवानगी घ्यावी, पोलिस प्रशासनाकडून परवानगी घेतल्यानंतरच जागेचा वापर करावा, रस्त्यावर बांधकाम साहित्य असल्यास सबंधितांनी तत्काळ उचलून रस्ता मोकळा करावा अशा सूचना पालिकेने दिल्या आहेत. साहित्य न उचलल्यास पालिकेमार्फत साहित्य उचलले जाईल तसेच त्याबाबतचा खर्च सबंधितांकडून वसूल करून गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा मुख्याधिकार्यांनी दिला आहे. मुख्याधिकार्यांनी कारवाईचा इशारा दिल्यामुळे शहरातील बहुतांश मार्गांवरील अडथळे दूर होणार आहेत. त्यामुळे आगामी काळात रहदारीच्या मार्गांवर बांधकाम साहित्य टाकण्याचे प्रकार थांबतील. त्यामुळे पादचारी आणि वाहनधारकांची मोठी गैरसोय लवकरच दूर होणार आहे.