जळगाव । स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्तीचे संकल्प शासनाने केले असून 2018 पर्यत संपुर्ण राज्य हागणदारीमुक्त होणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. हागणदारीमुक्तीठी लाखो रुपये खर्च करण्यात येत आहे. वैयक्तिक शौचालयासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शासनातर्फे 12 हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जात असून शौचालय बांधणे सर्वांसाठी सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच उघड्यावर शौचविधी करणार्यावर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हा नोंदविण्यात येत आहे.
मात्र यावल तालुक्यातील चितोडे या गावातील सार्वजनिक शौचालयात मुलभुत सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येते. चितोडे या गावात पहिल्यांदाच पुरुषांसाठी सार्वजनकि शौचालय बांधण्यात आले आहे. मात्र यातील लाईट बंद असल्याने रात्रीच्या वेळेस शौचालयाचा वापर करणे धोकादायक बनले आहे. शौचालयात लाईटची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने नागरिकांनी शौचालयाचा वापराकडे पाठ फिरविली आहे. रात्री तसेच पहाटेच्या वेळी शौचालयाचा वापर करणे कठीण झाले असल्याने नाईलाजास्तव पुन्हा नागरिक उघड्यावर शौचविधी करत असल्याचे दिसून येते. ग्रामपंचायतच्या उदासिन कारभारामुळे शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाचा पुरता बोजवारा उडाला आहे. याबाबत ग्रामपंचायतीकडे मागणी करुन देखील सुविधा पुरविण्यात येत नसल्याची तक्रार होत आहे.