सालदाराचा खून करत दरोडेखोरांची एसपी डॉ. उगलेंना ‘सलामी’

0

असोदा, ममुराबाद रस्त्यावरील शेतांमध्ये धुमाकूळ
विरोध करणार्‍या वृध्द सालदाराला मारुन विहिरीत फेकले
म्हाळसाई मंदिरातून सहा घंटे व रोकड लांबविली

जळगाव- तालुक्यातीय असोदा रोड तसेच ममुराबाद रस्त्यावरील शेतात मध्यरात्री तीन ते चार तास दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत जळगाव पिपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या शेतात काम करणारे दौलत एकनाथ काळे वय 65 रा. मुक्तांगण हॉलजवळ नेरीनाका या वृध्द सालदाराला मारुन विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना सकाळी समोर आली आहे.

ममुराबाद रस्त्यावरील म्हाळसाई संस्थान मंदिरातील 6 घंटे व दानपेटी फोडून 7 ते 8 हजाराची रोकड लांबविली. तत्पूर्वी मंदिरामागील सालदाराचा घराच्या दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला व त्याला दहशत दाखवित मंदिर फोडले. गुरुवारी पदभार स्विकारणार्‍या नूतन पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना दरोडेखोरांनी सलामी दिली असून दरोडेखोरांना पकडण्याचे आव्हान आहे.

असोदार रस्त्यावर भालचंद्र पाटील यांच्या शेतात कामावर असलेल्या सालदार काळे हे नेहमीप्रमाणे सकाळी घरी न आल्याने कुटुंबियांनी चौकशी केल्यावर प्रकार उघड झाला आहे. यानंतर नगरसेवक यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळ गाठले. व तालुका पोलिसांना फोन केला. कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठल्यावर या शेतानजीक अरुण खडके यांचा गोठाही फोडण्याचा प्रयत्न झाला. येथून चोरट्यांनी दौलत काळे यांना मारल्यानंतर शेतरस्त्याने म्हाळसाई मंदिर संस्थान गाठले. या ठिकाणी तीन तास धुमाकूळ घालत मंदिरातील सहा घंटे व एैवज लांबविला. यादरम्यान मंदिरामागे राहणार्‍या सालदार सुरेश प्रताप बारेला यालाही धमकावून दरोडेखोरांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो न उघडल्याने मंदिरातील एैवज लुटल्यावर दरोडेखोर पसार झाले. सुरेश बारेला या सालदाराने पोलीस अधीक्षकांसह अधिकार्‍यांना आपबिती सांगितली. त्यानुसार दहा ते अकरा पावर्‍या भाषेत दरोडेखोर असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनास्थळी पोलीस अधीक्षक उगले यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, डीवायएसपी डॉ. नीलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी.जे.रोहम, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक भागवत पाटील यांच्यासह अधिकार्‍यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. ठसे तज्ञ, श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान या घटनेने शेत शिवारातील शेतकर्‍यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.