भुसावळ । तालुक्यातील फुलगाव शिवारात सालदाराच्या खुनप्रकरणी 9 साक्षीदारांची तपासणी करुन अटकेत असलेल्या दोनही आरोपींची अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवार 11 रोजी निर्दोष मुक्तता केली. फुलगाव शिवारात राजेंद्र साहेबराव चौधरी यांच्या शेतात तीन वर्षापूर्वी सालदार रायसिंग बारेला याचा खुन त्यांच्या पत्नी समोर आरोपी राजू बारेला व नाक्या बारेला यांनी केला होता. याबाबत रायसिंग बारेला याच्या पत्नीने वरणगाव पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल होऊन दोघांना अटक करण्यात आली होती. भुसावळ प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे जबाब सुध्दा दिला होता. याप्रकरणी चार्जशीट दाखल होऊन अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. डोरले यांच्यासमोर कामकाज चालले. याप्रकरणी 9 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. न्यायालयाने प्रबळ पुराव्या अभावी तसेच पुराव्याच्या तफावतीवरुन गुन्हा सिध्द न झाल्यामुळे आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड. प्रफुल्ल आर. पाटील यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. संजय वानखेडे व अॅड. जया झोरे यांनी सहकार्य केले.