भुसावळ। तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकीसाठी तीन गटांसाठी 28 तर पंचायत समितीच्या 6 गणांसाठी 41 इच्छूक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एक अर्जास कागदपत्रांची पुर्तता करण्यात आलेली नसल्यामुळे तो अवैध ठरल्याने बाद करण्यात आला त्यामुळे 68 अर्ज वैध ठरले आहेत. तर आमदार संजय सावकारे यांच्या वहिणी पल्लवी सावकारेंसह इतर दोन अर्जांवर हरकत घेण्यात आली मात्र यावर वकिलांमार्फत युक्तीवाद सादर करण्यात आल्याने निवडणूक निर्णय अधिकार्यांनी या तीनही हरकत फेटाळल्या.
वराडसीम गणातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेले जयराम तुकाराम पाटील यांनी आपल्या नामांकन अर्जास जात पडताळणी प्रमाणपत्र जोडले नसल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी त्यांचा अर्ज अवैध ठरविल्याने तो बाद करण्यात आला आहे. त्यामुळे राहिलेले 69 अर्ज वैध ठरविण्यात आले.
रहिवास नसल्याने घेतली हरकत
कुर्हे-वराडसीम गटात अनु. जाती जागेसाठी भाजपाकडून उमेदवारी दाखल केलेल्या पल्लवी प्रमोद सावकारे यांच्या अर्जावर संगीता नारायण सपकाळे यांनी हरकत नोंदविली. यात त्यांनी पल्लवी सावकारे या निंभोरा सिम या भागात राहत नसल्याबाबत तसेच शहर व ग्रामीण भागातील मतदार यादीत नाव असल्याबाबत हरकत घेतली. यावर सुनावणी होऊन दोघांच्या वकिलांनी युक्तीवाद सादर करुन दोघांचा युक्तीवाद अवलोकन केला असता पल्लवी सावकारे या निंभोरा बु. येथे गट नं. 60 ते 64 मधील प्लॉट क्रमांक 19 नेहा उल्हास बोरोले यांच्या मालकीच्या घरात भाडेकरु म्हणून राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र दिले आहे.
रहिवास दाखला सादर
तसेच पल्लवी सावकारे यांनी ग्रामसेवक यांचा शौचालयाचा दाखला, रहिवास दाखल सादर केला आहे. तसेच विधानसभेच्या यादीनुसार त्यांचे नाव निंभोरा यादीत आहे. व भुसावळ पालिकेच्या निवडणूकीत मतदान केलेले नाही असा खुलास सादर केल्याने संगीता सपकाळे यांनी घेतलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी निकाली काढण्यात आली.
शिक्षण संस्थेने परवानगी नाकारली
तर हतनूर- तळवेल गटात अनु. जमाती जागेसाठी उमेदवारी दाखल केलेल्या प्रज्ञा जितेंद्र सपकाळे यांच्या अर्जावर सरला कोळी यांनी हरकत घेतली असून प्रज्ञा सपकाळे या ताप्ती विद्यालय दुसखेडा येथे कार्यरत असून त्यांच्या उमेदवारी अर्जावर संस्थेचे अध्यक्ष यांनी निवडणूक लढविण्यासाठी परवानगी नाकारल्याची हरकत घेतली होती. यावर युक्तीवाद मांडला असता प्रज्ञा सपकाळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानुसार नियम क्रमांक 42(2) मधील संस्थेची पुर्वपरवानगी घेणे ही अट नियमबाह्य ठरवलेली आहे. त्यामुळे सपकाळे यांचा अर्ज मंजूर करण्यात आला. यासह साकेगाव गणात सर्वसाधारण जागेसाठी एमआयएमकडून उमेदवारी दाखल केलेल्या जैतुनबी युसूफ शेख यांच्या अर्जावर अपक्ष उमेदवार शाहनाज लोधी यांनी हरकत घेतली मात्र त्यांची हरकत देखील निकाली काढण्यात आली.
यावल, रावेरलाही छाननी
रावेर येथे वाघोदा गणातून नामांकन दाखल केलेल्या जितेंद्र डोंगर वानखेड़े यांनी आपल्या उमेदवारी अर्जास जातीचा दाखला जोड़ला नसल्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला असून बाकी 96 वैध ठरविण्यात आले आहेत. यावल येथे जुम्मा शमशेर तडवी यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. यांचे कागदपत्रे पूर्ण नसल्याने अर्ज रद्द करण्यात आला. यात प्रमाणपत्र, टोकन, जात पडताळणी प्रमाणपत्र जोडण्यात आले नव्हते.