आरोपीला 11 मे पर्यंत पोलीस कोठडी ; गुन्ह्यात कलम वाढवले
यावल- तालुक्यातील सावखेडासीम गावातील पळवून नेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर अत्याचार झाल्याचे उघड झाले असून पोलिसांनी या गुन्ह्यात अत्याचार व पोस्को कायद्यांतर्गत कलम वाढवले आहे. अटकेतील आरोपीला भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास 11 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पसार आरोपींचा कसून शोध सुरू
सावखेडासीम येथील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणी 27 मार्च रोजी घरी एकटी असताना गावातीलच प्रशांत उर्फ समाधान अशोक पाटील, अशोक ओंकार पाटील, संगीताबाई अशोक पाटील, मीनाबाई जगदीश पाटील व समाधान पंडित पाटील या सर्वांनी तिला फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले होते. पोलीस तपासात संशयीत चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात असल्याचे आढळल्यानंतर पोलीस निरीक्षक डी. के. परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे, हवालदार संजीव चौधरी, राहुल चौधरी व एक महिला कर्मचार्याने मूल शहरातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या. पीडीत तरुणीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर अत्याचार झाल्याचे उघड झाल्याने या गुन्ह्यात कलम वाढवण्यात आले. दरम्यान, आरोपीस मंगळवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्या.क्षित्रे यांनी आरोपीस मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यातील अन्य संशयीत पसार असून त्यांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.