अल्पवयीन मुलीवर तिघांकडून चार दिवस बलात्कार

0

मदतीच्या बहाण्याने चंदननगर आणि भोसरी येथे घडला प्रकार

पिंपरी-चिंचवड : सावत्र आईच्या त्रासाला कंटाळून घर सोडून आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर मदत करण्याच्या बहाण्याने तीन जणांनी चार दिवस बलात्कार केला. हा प्रकार 11 ते 14 सप्टेंबर रोजी चंदननगर आणि भोसरी येथे घडला. मुलीच्या घरच्यांनी मुलगी हरविल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध घेतला, त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अब्दुल अहमद शेख (वय 33, रा. काटे वस्ती, दिघी) व विजय हनुमंत ननवरे (वय 30, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांना अटक केली आहे. आणखी एक आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पीडित मुलीच्या आईने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

मानसिक संतुलन बिघडले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील सोळू गावातील एक 17 वर्षीय मुलगी 11 सप्टेंबरला दुपारी घर सोडून निघून गेली. घरच्यांनी दिवसभर तिचा शोध घेतला; मात्र ती न मिळाल्याने त्यांनी त्याच दिवशी रात्री अकराच्या सुमारास आळंदी पोलीस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविली. यमुनानगर पोलीस चौकीत अशाच प्रकारची एक मुलगी हरविल्याची तक्रार दाखल झाली होती. त्या मुलीचा निगडी पोलीस शोध घेत होते. त्यावेळी निगडी पोलिसांना 13 ऑक्टोबरला आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरवलेली 17 वर्षीय मुलगी मिळाली. निगडी पोलिसांनी तात्काळ मुलीला आळंदी पोलीस ठाण्यात हजर केले. त्यावेळी तिला महिनाभर कोठे होती याबाबत विचारले असता, मुलगी काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्यामुळे आळंदी पोलिसांनी तिला तिच्या आईच्या ताब्यात देऊन ती कोठे गेली व कोणाकडे राहिली याबाबत विचारण्यास सांगितले.

लॉजवर नेले, घरात डांबले

आईने विश्‍वासात घेऊन विचारले असता तिने घडलेला सर्व प्रसंग सांगितला. 11 सप्टेंबर रोजी दुपारी ती घरातून निघाली. पायी चालत ती विश्रांतवाडी येथे गेली. तिथे तिला रामचंद नावाचा एक मोटारचालक भेटला. त्याने तिला चंदननगर येथील एका लॉजवर नेवून अतिप्रसंग केला. नंतर 12 सप्टेंबरला विमाननगर येथे सोडून दिले. विमाननगर येथे ओला उबेर मोटारचालक अब्दुल शेख हा तिला भेटला. त्याने मुलीकडे चौकशी केली. नंतर तिला समजावत सांगितले की, भोसरी मधील चक्रपाणी वसाहत येथे त्याचा मित्र विजय ननावरे आहे. त्याची बायको मयत झाली आहे. त्यामुळे तू त्याच्याकडे जाऊन रहा. असे सांगून अब्दुल याने तिला विजय याच्या घरी सोडले. विजय याने मुलीला 12 आणि 13 सप्टेंबर हे दोन घरात कोंडून ठेऊन तिच्यावर बलात्कार केला. 14 सप्टेंबर रोजी अब्दुल मुलीला भेटायला आला. मुलीने विश्‍वासाने अब्दुल याला घडलेला सर्व प्रसंग सांगितला.

दोघांना अटक, गुन्ह्याची कबुली

यानंतर अब्दुल आणि विजय यांच्यामध्ये काहीतरी चर्चा झाली आणि चर्चेनंतर विजय घराबाहेर गेला. त्यानंतर अब्दुल याने देखील त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. यावरून आळंदी पोलिसांनी अब्दुल आणि विजय या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणी नंतर दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.