सावदा : सावदा नगरपरीषदेत सत्ताधार्यांचा कार्यकाळा संपल्यानंतर प्रशासकांनी कारभार हाती घेतला आहे. प्रशासकांच्या काळात सन 2022-2023 यावर्षासाठी सत्तावन कोटी, दोन लाख, बेचाळीस हजार एकशे ब्यांणऊ रुपये खर्चाचा व 48 लाख सहा हजार 692 रुपये शिलकीचा अर्थसंकल्प नुकताच पालिका प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांच्याकडे सादर करण्यात आला. हा अर्थसंकल्प जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून तेथून मंजुरी मिळाल्यास किंवा काही दुरुस्ती असल्यास त्या झाल्यावर तो लागू करण्यात येणार आहे.
करवाढ नसल्याने मोठा दिलासा
या अर्थसंकल्पात शहरवासीयांच्या दृष्टीने कोणतीही करवाढ करण्यात न आल्याने नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. भांडवली खर्चासाठी 41 कोटी 35 लाखांची तरतूद करण्यात आली आहे तर महसुली खर्चासाठी 15 कोटी 62 लाख 52 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. अर्थसंकल्प मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लेखापाल विशाल पाटील, लेखापरीक्षक भारती पाटील व सहकार्यांनी तयार करून सादर केला. सावदा पालिकेच्या इतिहासात दुसर्यांदा प्रशासक यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे यापूर्वी देखील प्रशासक यांनी अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, या अर्थसंकल्पात गटारी, पथदिवे, नवीन पोल तसेच नवीन वाढीव वस्तीसाठी तरतूद करण्यात आली असून पालिका उत्पन्न, विविध ठिकाण येथून येणारे उत्पन्न गृहीत धरून तरतुदी करण्यात आल्या आहेत.